पापा गुप्ता : एका कष्टप्रद जीवनाची अखेर !
 जगणे नेमके कशाला म्हणावे? असा प्रश्न माणसाच्या मरणाने अधिक जाणवू लागतो. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कुणाचीही सुटका नाही, हे अंतिम सत्य होय. परंतु कधी-कसे हा भाग भावनात्मकदृष्ट्या महत्वाचा आहे. मृत्यू कधी येणार हे अनिश्चित आहे. कसा हे मात्र काहीसे माणसाच्या हाती आहे, असे मानले जाते. याचा अर्थ `काळजी घ्या` या शब्दात सामावलेला आहे. माणूस खरच निष्काळजी असत नाही; अनेकदा परिस्थिती तसेच स्वभाव त्याला कारणीभूत असतो. आज दि. १ जुलै २०१८ पहाटेच्या सुमारास आमचा मित्र असलेला पापा उर्फ राजेंद्र मधुकर गुप्ता याचे रूढअर्थाने अल्पशा आजाराने निधन झाले. जेमतेम ५८ वर्षाचा होता, म्हणजे शासकीय नोकरीच्या भाषेत सेवा निवृत्तीचे वय. पापाने अवघ्या आयुष्यातून निवृत्ती घेतली. त्याच्या जाण्याने त्याचा गुप्ता परिवार हादरलाच; परंतु अवघा मित्रवर्ग शोकमग्न झाला. अत्यंत सुस्वभावी तसेच भारदस्त व्यक्तिमत्व पापाचे होते. थट्टामस्करी करणारा हसतमुख असणारा पापा सर्वांना रडवून जातो हे दु:ख शब्दापलीकडचे आहे. त्याच्या जगण्याचीच क्रूरथट्टा नियतीने केली.
पापा गुप्ताच्या भाळी कष्टच लिहिलेले होते काय, असा प्रश्न त्याच्या कष्टप्रद जगण्याकडे पाहून पडायचा. पापाला या गोष्टीचे कधी दु:ख वाटले नाही. कदाचित वाटतही असेल तर त्याने आपल्या चेहऱ्यावर कधी दिसू दिले नाही. पापा खरतर उच्च शिक्षित होता. एम बी ए झालेला होता. व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेवूनही जगण्याचे व्यवस्थापन त्याच्याकडून होवू शकले नाही, असेच आता म्हणावे लागेल. त्याने इतरांची काळजी वाहतांना स्वत:च्या जगण्याकडे दुर्लक्षच केले होते. पापाने उच्च शिक्षणा नंतरही आपला पारंपारिक किराणा – भुसार मालाचा व्यवसाय सोडला नाही. दुकानात आल्यावर एकदा अंगातील शर्ट खुंटीला टांगला की तोच दुकानाचा मालक आणि नोकर असे. दुकानात काहीवेळ बसलेला त्याला कोणी पाहिलाच नाही. हीच गोष्ट त्याच्या जीवघेण्या आजाराला आमंत्रण देणारी ठरली. तब्ब्येतीकडे दुर्लक्ष हेच मुख्य कारण पापाच्या अकाली निधनास कारणीभूत ठरले, असे वाटते. यावर म्हटले जाईल की विधीलिखित कोणी टाळू शकत नाही.
पापा गुप्ता याचे किराणा दुकान माझ्या ऑफिस समोरच आहे. त्याची माझी रोजची भेट ठरलेली असायची. गावगाड्याच्या गप्पा व्हायच्या. बापू आहेर सुरवातीला आमच्यात असायचा; परंतु काही दिवसापूर्वी तोही कर्करोगाला बळी पडून अकाली गेला. आमचा चौक सुना सुना होत चालला आहे. बोलणारी माणसे परत न येण्याच्या प्रवासाला निघून जाताहेत, हे दुखः मोठे आहे. रोज दिसणारी, भेटणारी माणसे पुन्हा दिसणार नाहीत. काळ झपाट्याने पुढे सरकतोय. काळ अनेक प्रश्नाचे उत्तर आहे, असे म्हटले जाते; परंतु काळच अनेक प्रश्न निर्माण करतो असेही आता वाटू लागले आहे. या प्रश्नाचा गुंता सोडविणे मोठे कठीण आहे. पापाच्या रूपाने एका धिप्पाड शरीराच्या आत असंख्य वेदना दडलेल्या होत्या याची जाणीव त्याच्या अकाली जाण्याने झाली आहे. असे दुखः दुष्मनाच्याही वाट्याला येवू नये; पापा तर आमचा मित्र होता.
पापा गुप्ताचा परिवार फार मोठा आहे.  आजही त्यांचे कुटुंब एकत्रित आहे. सगळेच भाऊ गुण्यागोविंदाने राहतात. या भरल्या कुटुंबातून पापाने एक्झिट घेतली आहे. त्याची उणीव सतत जाणवत राहील. पापाचे त्याच्या मुलींवर विशेष प्रेम होती. मुलगी नुकतीच डॉक्टर झाली. त्याचा त्याला खूप अभिमान होता. तिच्या साठी त्याने खूप खस्ता खाल्ल्या. आता तिची प्रगती त्याला पहायची होती. ते सुख नियतीने त्याला लाभू दिले नाही. पापाचे संपूर्ण कुटुंब नांदगाव शहराला परिचित आहे. किशोर गुप्ता हे त्याचे मोठे बंधू, तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संतोष गुप्ता हे त्याचे धाकटे बंधू, प्रवीण व गुड्डू यांचाही मित्र परिवार मोठा आहे. असा आमचा दिलदार मित्र आज भरल्या परिवारातून निघून गेला आहे. हे दुखः पेलण्याचे सामर्थ्य त्यांचेत येवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली!
                                                   _ भास्कर कदम (माजी नगराध्यक्ष, नांदगाव)           

Comments