निसर्गकवी महानोरांच्या जडण-घडणीत नांदगावचा खारीचा वाटा! पद्मश्री ना. धो. महानोर (दादा) यांचा १६ सप्टेंबर हा वाढदिवस. दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी जगन्नियंत्याकडे प्रार्थना ! नांदगावशी महानोर दादांचे एक वेगळेच नाते आहे. दादांचे सासरे मदनेबाबा हे नांदगावी रेल्वेत नोकरीला होते. येथील आनंद नगरमध्ये सासरेबुवांचे घर होते. नांदगाव शहर तसे खेडे वजा गाव. खरेतर नांदगावला रेल्वे मुळेच महत्व प्राप्त झाले होते. नांदगावचा उल्लेखच स्टेशनचे नांदगाव असा केला जातो. रेल्वेची लायब्ररी फार मोठी होती. लायब्ररीची इमारत अतिशय भव्य अशी आहे. यंदाच्या म्हणजे २०१८ सालात या इमारतीला १०० वर्ष पूर्ण होताहेत. भुसावळ - इगतपुरी दरम्यान नांदगाव रेल्वे स्टेशनला इंजीनमध्ये कोळसा आणि पाणी भरले जायचे. नांदगावचे लोकोशेड फार मोठे होते. रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या खूप मोठी होती. त्यामुळे शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. रेल्वे लायब्ररीत ग्रंथसंपदा विपुल होती. सर्व नियतकालिके, मासिके तेथे नियमित येत असे. महानोर दादांसाठी रेल्वेची...