माथेफिरुंचे विसर्जन कधी होणार?
गणपती विसर्जन आणि पत्रकार गौरी लंकेश यांची
हत्या या दोन बातम्या सगळ्याच माध्यमावर प्रमुख होत्या. मन अंतर्मुख झाले. नेमके
विसर्जन कुणाचे झाले. गणपतीला तुम्ही बुद्धीचीही देवता मानता ना? मग व्यक्तीची
गोळ्या घालून निर्घुण हत्या कुठल्या बौद्धीकतेत बसते. अविचाराने विचार मरत नसतो,
हे माहित असूनही असे घडते तेव्हा माथेफिरूच असे अविचारी कृत्ये करीत असतात, असे
आजवर अनादी काळापासून घडत आलेय. त्यांच्याच विचारात सांगायचे तर देवादिकानाही
राक्षसांनी सोडले नव्हते. तुमच्यातील राक्षस-सैतान कधी मरणार आहे, कारण विचारी माणसे सैतानालाही अविचाराने मारणार
नाही. आपल्याला न पटणारा विचार गळे घोटून संपविण्याचा प्रकार अघोरी विध्येसारखा
आहे. त्याला मूठमाती कधी मिळेल. अविचारी माथेफिरुंचे विसर्जन कधी होणार?
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कुलबुर्गी
यांच्या हत्येनंतर आता गौरी लंकेश यांची हत्या. काय प्रकार आहे हा? एवढे माजोरीपण
आले कसे, कोठून आणि कशामुळे? सगळ्यांची हत्या जवळपास एकाच तंत्राने झाली आहे. हे
सारखेपण कुठल्या विचारातून आले; या एकसूत्रीपणाला विचार कसा म्हणता येईल? मारेकरी
गोळ्या घालून पळून जातात, ते सापडत नाही याला काय म्हणावे, असा प्रश्न पडला आहे.
विचारांची लढाई विचारांनी लढणे हे आता जवळपास संपले आहे काय? मारेकरांना कोण
पाठीशी घालतय याचाही शोध घेतला गेला पाहिजे; परंतु घेणार कोण आणि कधी? तपास चालू
आहे हे उत्तर म्हणजे एक प्रकारचा अन्याय ठरत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत लेखन-विचार
स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना बहाल केले आहे. त्या विचारांचाच हा खून आहे. फौजदारी
दंडसंहितेत खुन्याला शिक्षाही आहे. परंतु खुनी सापडले तर हे घडू शकते. आपल्या
न्यायव्यवस्थेत तांत्रिक मुद्यावर शंभर अपराधी सुटले तर चालतील; परंतु एक निरपराधीवर
अन्याय नको. त्यासाठी नैसर्गिक न्याय हे तत्व पुढे येते. याचा गैरफायदा गुन्हेगार
उठवितात, तसेच वर्षानुवर्ष आरोपी सापडत नाही, असे अनेकदा घडत आहे. काळाच्या उदरात
अनेक प्रश्न दडलेली असतात असे म्हटले जाते तसेच काळच अनेक प्रश्नांचे उत्तरही असते,
असेही दिसून आले आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो आहे; अशी म्हण
आहे. आज प्रगल्भ विचारवंत मारले जात असून काळ मात्र सोकावतो आहे, या विरोधाभासाला
कोणत्या चौकटीत बसवावे, हा प्रश्न आहे.
कुत्रा चावला म्हणून कुत्र्याला चावता येणार
नाही, हे जरी खरे असले तरी त्यावर विचारांनीच उपाय शोधावाच लागेल. आज पुरोगामी
विचारांचे लेखक – पत्रकार हे बुरसटलेल्या विचारांचे बळी ठरत आहे. देशाला
स्वातंत्र्य मिळाले. सुराज्य कुठाय हा प्रश्न आजही कायम आहे. विकासाचे ढोल बडवील्या
जात असतांना विकास कोणाचा आणि किती होतोय हा संशोधनाचा तसाच संशयाचा विषय आहे.
विचारी माणसांना आपला राग व्यक्त करण्यासाठी शब्दांचेच माध्यम आहे. शब्दांमुळेच
दाभोलकर, पानसरे, कुलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या झाली, त्याच्या निषेधार्थ
तसेच सहवेदना व्यक्त करण्यासाठी पुन्हा शब्द वापरावे लागत आहे. ठोकशाहीला शहाणी
माणसे त्याच पद्धतीने उत्तर देणार नाही. परंतु एक लक्षात घ्यावे, जगावर अधिराज्य
गाजवायला निघालेल्या हिटलरलाही शेवटी आत्महत्या करावी लागली हा इतिहास आहे. या
इतिहासापासून बोध कोण घेणार? अविचारी माणसांकडून अशी अपेक्षा करणे म्हणजे मूर्खाच्या
नंदनवनात वावरणे होईल. पुन्हा काळाचीच वाट पहावी लागेल, हेच खरे होय... - भास्कर कदम, नांदगाव

Comments
Post a Comment