भोंदूबाबा आणि संसार ...

               भोंदूबाबा आणि संसार ...
श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन शब्दात खूप अंतर आहे. परंतु, ह्या दोन्ही बाबी एकच आहेत; असे अनेकजण मानतात. मानवी मनाच्या विविध अवस्था आहेत; याचा ठाव घेणे मोठे कठीण काम आहे. काहीजण मनाने कणखर असतात तर काहींची मानसिक अवस्था चंचल, दुर्बल असते. मानसिक, आर्थिक, शारीरिक परिस्थितीशी बऱ्याच गोष्टी निगडीत असतात. काहीजण आर्थिक सक्षम असतात; परंतु ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असतात. आपली ही कमजोरी दूर करण्यासाठी अथवा लपविण्यासाठी ते वेगळ्या मार्गाचा शोध घेत असतात. अश्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत असते. खरेतर भोंदू बाबांपेक्षा त्यांचे समाजातील विविध घटकात वावरणारे अनुयायी महाभयंकर असतात; तेचतर भोंदू बाबांचे मूळ अस्र असते. भोंदू बाबांचे प्रस्थ माजविण्यासाठी ही तथाकथित मंडळीच कारणीभूत असते. आसाराम-नारायण काय, रामपाल आणि रामरहीम काय हे सगळे एकाच माळेतील मणी. माणूस म्हटला की त्यात षडरिपू दडलेले असतातच. माणसातील हे गुण-दोष परिस्थितीनुसार डोके वर काढतात. 
गुणी माणसे तथा साधू-संत यांचा पंथच वेगळा असतो. ते आपल्यापरीने सत्कर्म करीत असतात. अशी माणसे, साधू-संत आदरास पात्र आहेत. परंतु भोंदू बाबांचे चाळे काही औरच असतात. भोंदू बाबा बरोबरच त्याचे काही नालायक अनुयायी याचा गैर फायदा घेतात. अती झाले की भोंदू बाबा व त्याच्या चेलेचपाटे यांचा भंडाफोड होतो. अश्या भानगडीमुळे काही कुख्यात भोंदू बाबा तुरुंगाची हवा खात आहेत. सापडला तो भोंदू, लुच्चा, लफंगा ठरत आहे; परंतु आजही समाजात अनेक भोंदू बाबा अस्तित्वात असावेत, त्यांचाही शोध-बोध घेतला पाहिजे. कायदा करून असे प्रश्न सुटतात असे नाही तर त्यासाठी समाज प्रबोधन, जागृती महत्वाची आहे.
एक गोष्ट यानिमित्त आठवली. असाच एक भोंदूबाबा होता. बालपणापासूनच तो भगवे कपडे घालू लागला. केस-जटा-दाढी वाढविली. वयात आल्यानंतर वरकरणी तो साधू वाटू लागला. समाजात साधूला पूजनीय स्थान आहे. या भोंदूबाबाचे  प्रस्थ तालुक्यात वाढू लागले. अनुयांची संख्याही वाढू लागली. त्याला गावोगावी आमंत्रणे येवू लागली. या तथाकथित भोंदू बाबाच्या चरणी  अनेक श्रद्धाळू तसेच अंधश्रद्धाळू आपला माथा टेकवीत असे. भोंदूबाबा आपल्या स्टाईलने आशीर्वाद देत असे. काहीजण बाबाच्या आशीर्वादाने कृतकृत्य झाल्यासारखे दिसू लागले. बाबाबी खुश आणि भक्तबी खुश असे ते दृश्य असायचे. बाल ब्रम्हचारी म्हणून त्याच्याकडे आदराने पहिल्या जायचे. काही काळ गेला. काळानुसार बाबाचेही वय वाढले. हळूहळू या तथाकथित बाबाच्या अंगातील माणूस जागा होवू लागला. काही दिवस तो चोरून–चोरून एका त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या भाविकेकडे जावू लागला.
बाबाच्या दुर्दैवाने त्या भाविकेच्या घराशेजारी एका ग्रामीण पत्रकाराचे घर होते. बाबा रोजच शेजारी येवू लागल्याने त्याच्यातील पत्रकार जागा झाला. पत्रकाराला कुणकुण लागली की, बाबातील माणूस जागा झाला असून त्याचे भाविकेवर प्रेम जडले आहे. पत्रकाराने एक दिवस त्याच्या पेपरमध्ये बाबाच्या छुप्या प्रेम प्रकरणाची बातमी छापली. बातमीने बाबाचा बोभाटा झाला. बाबाचे येणे-जाणे खंडित झाले. परंतु प्रेम मात्र कायम होते. बाबाने सदर पत्रकाराला  समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. बाबाने त्यावर तोडगा काढला. दुसऱ्या एका भाविकेच्या माध्यमातून आपल्या प्रेमिकेशी संवाद चालू ठेवला.  त्यातूनच बाबाने एक नवा मार्ग शोधला. एके दिवशी भल्या पहाटे ते दोघे गाव सोडून निघून गेले. गावात मात्र चर्चा झाली. बाबाने बाई पळवली. 
बाबातील माणूस जागा झाला होता, हे वास्तव होते. त्या बाबाच्या रूपावर माणसाच्या रूपाने मात केली होती. काही दिवसांनी बाबा गावाकडे फक्त भेटण्यासाठी परत आला. त्यावेळी त्याचे रुपडे संपूर्ण पालटलेले होते. अंगात टी शर्ट, जीनची प्यांट, केश कापलेले. मस्तपैकी भांग पाडलेला होता. त्यावेळी तो काही मित्रांना भेटला. त्यावेळी त्याने मित्रांजवळ एक विचार मांडला. तो मोठा अंतरर्मुख करणारा होता. तो अतिशय प्रामाणिकपणे म्हणाला, माझे ब्रम्हचर्य वीस वर्षांपर्यंत होते. वीस वर्ष मी ते पाळले. नंतर मी गृहस्थी जीवन जगायचे ठरविले. त्यानुसार मी लग्न केले. आज संसारात आहे. माझा संसार सुखाने चालला आहे. सदरची घटना सत्य आहे. यातील नावे जाणीवपूर्वक टाळले आहे. आसाराम-रामपाल, रामरहीम या बाबातील सैतानापेक्षा या तथाकथित बाबातील माणूस काहीअंशी बरा म्हणता येईल का, हाही एक यक्षप्रश्न आहे. लग्न करून पुन्हा संसाराला लागलेल्या बाबाचे वर्तन चूक की बरोबर हे ज्याने त्याने ज्याच्या-त्याच्या पद्धतीने शोधायचे आहे.                                   - भा. ना. कदम 




                             

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !