निसर्गकवी महानोरांच्या जडण-घडणीत नांदगावचा खारीचा वाटा!
पद्मश्री ना. धो. महानोर (दादा) यांचा १६ सप्टेंबर  हा वाढदिवस. दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, अशी जगन्नियंत्याकडे प्रार्थना ! नांदगावशी  महानोर दादांचे एक वेगळेच नाते आहे. दादांचे सासरे मदनेबाबा हे नांदगावी रेल्वेत नोकरीला होते. येथील आनंद नगरमध्ये सासरेबुवांचे घर होते. नांदगाव शहर तसे खेडे वजा गाव. खरेतर नांदगावला रेल्वे मुळेच महत्व प्राप्त झाले होते. नांदगावचा उल्लेखच स्टेशनचे नांदगाव असा केला जातो. रेल्वेची लायब्ररी फार मोठी होती. लायब्ररीची इमारत अतिशय भव्य अशी आहे. यंदाच्या म्हणजे २०१८ सालात या इमारतीला १०० वर्ष पूर्ण होताहेत. भुसावळ - इगतपुरी दरम्यान नांदगाव रेल्वे स्टेशनला   इंजीनमध्ये  कोळसा आणि पाणी भरले जायचे. नांदगावचे लोकोशेड फार मोठे होते. रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या खूप मोठी होती. त्यामुळे शहराला एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. रेल्वे लायब्ररीत ग्रंथसंपदा विपुल होती. सर्व नियतकालिके, मासिके तेथे नियमित येत असे. 
महानोर दादांसाठी रेल्वेची लायब्ररी मोठी पर्वणीच होती. ज्या-ज्या वेळेस दादा सासुरवाडीस येत तेव्हा त्यांचा वेळ रेल्वेच्या लायब्ररीत जात असे. दादा तेथे तासनतास वाचन करीत असे. दादामधील साहित्याला जसे अजिंठाच्या परिसराने परीसस्पर्श केलाय तसाच किंचितसा स्पर्श नांदगावच्या रेल्वे लायब्ररीचाही आहे. तसा उल्लेख नांदगावच्या अनेक समारंभात दादांनी केलाय. पळस खेड्यावर तसेच तेथील शेती मातीवर जसे दादांचे निसर्गदत्त प्रेम आहे. तसेच नांदगावचा रेल्वेचा निसर्गरम्य परिसर त्यांच्या मनाला भुरळ घालायचा. आज रेल्वेचा परिसर तसा राहिला नाहीय. कोळसा इंजीन जावून इलेक्ट्रिक इंजिन आले. नांदगावच्या रेल्वेला उतरती कळाच लागली. रेल्वेचे कर्मचारी कमी झाले. तशी लायब्ररीला अवकळा आली आहे. आता आम्ही आठवणीवरच समाधान मानत आहोत.
आठ -दहा वर्षापूर्वी दादांच्या सासऱ्यांचे नांदगावी निधन झाले. तेव्हा दादा दोन-तीन दिवस नांदगावी होते. नांदगावातील साहित्य क्षेत्रात रुची असलेल्या आम्ही काही मंडळीने  अगोदरच काव्य मैफिलीचे आयोजन केले होते. कार्यक्रम अत्यंत छोटेखानी होता. काहींच्या डोक्यात कल्पना आली. महानोर दादा नांद्गावीच आहे तर ते आले तर खूप चांगले होईल. नुकतेच दिवंगत झालेले माझे पत्रकार मित्र बापू आहेर तसेच रमेश सोर, प्रकाश गोटे या दादांच्या कौटुंबिक मित्रांची याकामी मदत घेतली. दादांना माझ्या प्रेसवर चहापाण्यासाठी बोलावले. दादाही आले. त्यांना मित्रांची विनंती सांगितली. दादा सुरवातीला म्हणाले मी वेगळ्या विधीसाठी नांदगावी आलो आहे. अशा प्रसंगी कार्यक्रमास येणे उचित होणार नाही. तुम्ही पुन्हा केव्हा तरी बोलवा मी निश्चित येईल. आम्ही थोडी गळ घातली. दादांना आमचा उत्साह पाहून आमचे मन मोडविले नाही. दुसऱ्या दिवशी ते कार्यक्रमास आले. सारे दु:ख  विसरून दादांनी कविता सादर केल्या. छोट्या सभागृहातही दादांची लय लागली होती. त्यांच्या कवितांनी सारे सभागृह न्हावून निघाले. 
त्या दिवसापासून आजतागायत दादांशी कौटुंबिक स्नेह कायम आहे. दादांची नाळ नांदगावशी आजही जोडलेली आहे. नांदगावी ते आले की आम्हाला एक पर्वणीच असते. असे शब्द व माणसावर प्रेम करणारे निसर्गकवी यांचा आज वाढदिवस आम्हा सर्वांच्या दृष्टीने आनंद दिवस आहे. ज्यांनी आपल्या शब्द सामर्थ्याने अवघे मराठी साहित्यविश्व व्यापले आहे आणि ते आपले सर्वाचेच आहे याचा सार्थ अभिमान आहे. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!              -  भास्कर कदम                  

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

भोंदूबाबा आणि संसार ...