माणुसकीचे दर्शन !

माणुसकीचे दर्शन ...
रविवार...दि. ३ सप्टेंबर २०१७...वेळ सकाळी ९.३० वाजताची...आम्ही नांदगावहून नाशिकला निघालो होतो...

रस्त्यात नागापूरजवळ समोरुन एक मोटरसायकल येत होती...पूल ओलांडून मोटरसायकल पुढे आली. पुढच्या स्पीडब्रेकरवर तिला जोराचा झटका बसला. मोटरसायकलवर पाठीमागे बसलेली बाई आणि बाळ काही कळण्याआधी जमिनीवर कोसळले. बाईच्या डोक्याला मार लागला. रक्त भळभळू लागले. हातातील लहान बाळ रडायला लागले. त्याला मात्र काही लागले नव्हते. एका क्षणात हे घडले होते. आम्ही उतरलो. तेवढ्यात नाशिकवरून नांदगावचेच रहिवाशी, नाशिक उद्योगवर्धिनीचे संचालक चांडक सहकुटुंब नांदगावी येत होते. त्यांनीही गाडी थांबविली. त्यातील महिला भरभर खाली उतरल्या. त्यातील एका महिलेने तत्काळ रुग्णवाहिकेसाठी १०८ क्रमांकास फोन लावला. चांडक यांच्या मुलीने जखमी महिलेवर प्रथमोपचार करण्यास सुरुवात केली. कोण-कुठले जखमी झाले, याची चौकशी प्रथम कुणीही केली नाही. प्रत्येकजण तातडीने त्या जखमी महिलेला मदत कशी करता येईल हाच प्रयत्न करीत होते. १०८ ला येण्यास उशीर होईल म्हणून एकाने माजी आमदार संजय पवार यांची रुग्णवाहिका जवळच असल्याचे सांगितले. त्यानेच परस्पर फोनही केला. पाचच मिनिटात रुग्णवाहिका हजर झाली. त्या पाठोपाठ माजी आमदार संजय पवार, त्यांचे बंघू राजेंद्र पवार हेही घटनास्थळी आले. हे सगळे दृश्य त्या महिलेचा नवरा बघत होता. त्याला काहीही करण्याची म्हणजे मदतीची याचनाही करण्याची गरज कोणीही भासू दिली नाही. त्याची विचारपूस केली असता त्याने नांदगावचा असल्याचे सांगितले. माजी आम. पवार यांनी नांदगाव रुग्णालयाचे डॉक्टर रोहन बोरसे यांना फोन करून जखमीची माहिती दिली आणि रुग्णवाहिका नांदगावच्या दिशेने रवाना केली. चालक त्यांचा मुलगाच झाला होता. मोटर सायकलवाल्याची माहिती घेतली असता तो नांदगावच्या आदिवाशी कुटुंबापैकी होता. त्याचे राहणीमान त्याची परिस्थिती दर्शवित होते. चांडक कुटुंब तसे व्यापारी वर्तुळातील आहे. त्या कुटुंबातील महिलांनी विशेषत: त्यांच्या सुशिक्षित मुलीने त्या जखमी आदिवाशी महिलेची आपल्याच कुटुंबातील कुणी सदस्य असावे, अशा पद्धतीने सुश्रुषा केली, याला शब्दात वर्णन करणे सोपे नाही. त्याठिकाणी जमलेल्यापैकी कुणीही त्या कुटुंबाची जातपात, परिस्थिती न पाहता मदत करीत होते. त्या महिलेचा पती हे दृश्य पाहून त्याच्या तोंडून शब्दही फुटू शकत नव्हते. मला त्या दिवशी माणुसकीचे दर्शन घडले. अजूनही समाजाच्या विविध घटकात माणुसकी जीवंत आहे, याची जाणीव झाली. मला याठिकाणी स्वत:पेक्षा इतरांनी काय मदत केली हे सांगणे महत्वाचे वाटले. ज्यांनी ज्यांनी माणुसकीच्या नात्याने मदत केली त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दोन शब्दांचा प्रपंच केला.      - भास्कर कदम, नांदगाव            

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

भोंदूबाबा आणि संसार ...