राम शेवाळकर : बोलण्याप्रमाणे वागणारा हिमालयाएवढा माणूस !
राम शेवाळकर :
बोलण्याप्रमाणे वागणारा हिमालयाएवढा माणूस !
गेल्या तेहतीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गोष्ट
काल्पनिक नव्हेतर वास्तवात घडलेली. आजही स्वप्नवत वाटावी अशी. माझ्या आजवरच्या ६०
वर्षाच्या जीवनात अनेक भली-बुरी माणसे आली. ही एका भल्या माणसाची गोष्ट आहे. मी
तेव्हा २६-२७ वर्षांचा होतो. अतिशय पोरसवदाच. घरात चळवळीचा-पत्रकारितेचा वारसा.
मीही त्यावेळी लोकमत या दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून काम पाहायचो. आमचे स्वत:चे
समर्पित नावाचे साप्ताहिक होते. युवक बिरादरी तसेच मराठी शाहीर परिषदेला समर्पितचे
मोठे योगदान होते. होते हेच खरे. आज समर्पित बंद आहे. पत्रकारितेचा धंदा करताच आला
नाही. त्यामुळे ते डब्यात गेले, हे भाकीत ज्यांनी केले होते ते म्हणजे मराठी साहित्य विश्वातील एक आदरणीय नाव -
प्राचार्य राम शेवाळकरसर.
त्यांची २ मार्चला जयंती आहे, म्हणून आठवणीच्या माध्यमातून त्यांचे स्मरण करावे.
त्यांच्या स्मृतीला प्रणाम करावा, या हेतूने हा ब्लॉग आज लिहितोय. ज्यांनी ज्यांनी
आमच्या लेखणीला विचार दिला, धार दिली, बळ दिले, आशीर्वाद दिलेत, त्यापैकी राम
शेवाळकर एक होत.
राम शेवाळकरसर यांची माझी भेट आमच्या
नांदगावला सन १९८५ मध्ये झाली. लायन्स क्लबच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने
प्रमुख पाहुणे म्हणून ते नांदगावी आले होते. डॉ. यशवंत बर्वे यांचेकडे सर थांबले
होते. कार्यक्रम सायंकाळी ५ वाजेचा होता. सर सकाळीच नांदगावी आलेले होते. ५
वाजेपर्यंत म्हणजे भरपूर वेळ होता. डॉ. बर्वे यांचा मला फोन आला. अरे, माझ्याकडे रामभाऊ आलेले आहेत. ते त्यांना
प्रेमाने रामभाऊ म्हणत. त्यांना भेटायला तू ये. ते निवांत आहे. येतांना तुझे
समर्पितचे अंक घेवून ये. मला खूप आनंद झाला. मी आमचे काही अंक सोबत घेवून
डॉ. बर्वे यांच्या घरी गेलो. शेवाळकरसरांचे नुकतेच जेवण आटोपले होते. ते घरातल्या
घरात शतपावली करीत होते. मी भेटायला आल्याचा निरोप डॉ. बर्वे यांनी त्यांना दिला. मी त्यांना आदराने नमस्कार
केला. मला बसण्याची खुण केली. त्यांच्या काहीवेळ येरझाऱ्या चालूच होत्या. ते
व्याख्यानापूर्वी रीयाज करीत असावे, असे मला भासले. नंतर तेही बसले. तुझे नाव. मी नाव
सांगितले. डॉक्टरांनी आपली भेट घेण्यासाठी मला पाठविले, हे सांगितले. तू सध्या काय करतोस, असा प्रश्न मला केला.
त्यावर मी आमचे समर्पितचे काही अंक दाखविले. आमच्या दिवाळी अंकात महाराष्ट्रातील
चळवळीतील नामवंत लेखकांचे साहित्य त्यांनी पाहिले. माझ्या मित्रांपैकी बरेच
तुझ्याकडे लिहितात. मलाही तुझ्या अंकात लिहायला आवडेल, असे म्हणाले; आणि ते बोलले
तसे वागले.
सर एका वेगळ्याच धाटणीचे वाटले. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी
त्यांच्याठायी ओतप्रोत भरलेले होते. नाटकी-अहंकारयुक्त काहीही नव्हते. खरेतर
पहिल्याच भेटीत त्यांची माझी खूप जुनी ओळख आहे, अशा रीतीने ते वागले-बोलले.
यापूर्वी स्वत:ला मोठी समजणारी अनेक दांभिक माणसे मी पहिली होती. त्या माणसांच्या
देहबोलीतून ते जाणवायचे. सर बाबा आमटे यांच्या आनंदवनातील एक होते. त्यांच्या
बोलण्यातून सारखी आनंदवनातील उदाहरणे यायची. सर अगदी मनापासून भरभरून बोलायचे.
तासनतास ऐकावे असे. माझ्याकडून नांदगाव शहराविषयी जाणून घेतले. शहराला दोन वेश,
वेशीच्या भिंतीच्या आत गाव बंदिस्त अशी रचना पूर्वी होती. सरांनी गावात येतांनाच
हे पाहिले होते. ते म्हणाले या गावाला इतिहास असला पाहिजे. तुझ्या सारख्याने यावर
लिहिले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी मला दिला. मी आजवर तो पूर्ण करु शकलो नाही.
त्यानंतर ते माझ्या समर्पित या विषयावर आले.
समर्पित विषयी माहिती विचारतांना
त्यांनी सर्व बारकाईने विचारले. तुझे वार्षिक वर्गणीदार किती, हा त्यांचा पहिला
प्रश्न होता. मी नकारार्थी मान हलवली. त्यांना मी समर्पितची निर्मिती प्रक्रिया
सांगितली. सर या अंकाचे मालक, मुद्रक, प्रकाशक, कंपोझीटर, प्रिंटर, असे सगळे
आम्हीच आहोत. आमचा छोटासा प्रिंटींग प्रेस आहे. मी स्वत: संपूर्ण अंक कम्पोझ करतो.
ट्रेडल मशीनवर स्वत: छपाई करतो. अंकाला घड्या घालणे, ते पोस्ट करणे ही सर्व कामे
आम्ही दोघे भाऊ करतो. त्यातून तुम्हाला उत्पन्न काय मिळते? त्यांचा रोख आर्थिक होता.
मी म्हटले, समाधान मिळते. इतर कामे प्रेसमध्ये करतो. लग्नपत्रिका व इतर छपाइतून
काही पैसे मिळतात. त्यातूनच अंकाचेही भागवितो. यावर ते माझ्या चेहऱ्याकडे पाहू
लागले. असे तुम्ही किती दिवस करु शकाल? हे फार काळ टिकू शकत नाही. अर्थ कारणाची
जोड असल्याशिवाय समर्पित टिकू शकत नाही. मला त्यांनी आवर्जून सांगितले, हे टिकवा.
मला तुझा प्रेस बघायचा असे तेच मला म्हणाले. आपण माझे व्याख्यान संपले की जावू. तू
मला घ्यायला ये.
लायन्स क्लबचे जैनधर्म शाळेतील सरांचे
व्याख्यान हृद्यस्पर्शी झाले. त्यांचा आतला आवाज लागला होता. श्रोते मंत्रमुग्ध
होवून ऐकत होते. त्यात मी एक होतो. आई हा शब्द कोणत्याच पुस्तकात मावू शकत नाही,
हे त्यांनी विषद करून मातृत्व काय असते, आणि मानवता काय असते हे अनेक दाखले देवून सांगितले.
माणसाने माणसासाठी नव्हेतर पशुपक्षी, वृक्षवल्ली यांच्याशी म्हणजेच निसर्गाशी
माणुसकीने वागावे, हे जीवनसूत्र त्यांनी सांगितले. आनंदवनातील माणूसकीचा गहिवर
त्यांनी सांगितला तेव्हा संपूर्ण सभागृह गहिवरले होते. कुष्ठरोग झालेला माणसाला
डोळेच नव्हते. त्याच्या वेदनेचे अश्रू नाकातून यायचे हे त्यांनी कथन केले.
माणुसकीला पाझर फोडणाऱ्या या वास्तवातील गोष्टी होत्या. त्या वेदनेचे भावविश्व
त्यांनी आनंदवनात अनुभवले होते. समाजासाठी काम करणाऱ्या आनंदवनासारख्या मिणमिणत्या
पणत्या समाजानेच जपल्या पाहिजे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या शब्दाला
वास्तवतेची किनार होती. सरांची शब्दफेक टिपेची होती. मी अनेक व्याख्याने ऐकली.
शेवाळकरसर त्यांच्यातील एव्हरेस्ट होते. वागणे तसे बोलणे म्हणूनच त्याला हिमालयाची
उंची होती.
सरांचे व्याख्यान संपल्यानंतर
श्रोते, आयोजक त्यांना आपलेपणाने भेटत होते. त्या गर्दीतून मी वाट काढली. त्यांना प्रेसला
भेटीची आठवण दिली. अरे तू कुठे होतास, मी तुला व्याख्यानापुर्वी शोधत होतो. पहिले
तुझ्याकडे जावू असा माझा विचार होता. मी त्यांना म्हणालो सर व्याख्यान संपल्यानंतर
मी तुझ्याकडे येईल, असे आपण सांगितले होते. ठीक आहे चल. माझ्यासोबत लगेच चल
म्हणाले. सोबत डॉ. बर्वेदादा, डॉ. कोठाडिया होते. माझ्या पाठीवर हात ठेवून ते मला
म्हणाले, दुपारच्या तुझ्या भेटीने माझा विषयच बदलला. समाजाला विचार देणाऱ्या
मिणमिणत्या पणत्या विझता कामा नये, हेच माझे विषयसूत्र झाले. चांगल्या विचारांना
जर समाजाचे पाठबळ नसेल तर ते विचार अकाली मरेल, याची प्रकर्षाने जाणीव झाली, असे
त्यांनी सांगितले. तू माझ्या नजरेसमोर होतास. खरेच आम्ही तेवढे उंचीचे नाही; परंतु
एखाद्याला उभारी द्यायची तर या माणसाचे मन किती विशाल आहे. त्याची खोली-रुंदी
शब्दात मावू शकत नाही.
सरांनी समर्पितच्या दिवाळी
अंकासाठी कवी ना. घ. देशपांडे यांचेवरचा लेख पाठविला. त्या दिवाळी अंकाची
अर्पणपत्रिका मिणमिणती पणती या मथळ्याखाली राम शेवाळकर यांच्या नावे केली.
त्यावेळी ते हयात होते. आज ते नाहीत. त्यांच्या भाकिताप्रमाणे आम्ही व्यवसाय केला
नाही म्हणून अंक बंद पडला. खूप वाईट वाटते. दुधाची तहान ताकावर भागवावी म्हणून
मधूनअधून ब्लॉग लिहितोय. ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरू
शकत नाही. समाजात आजही चांगली माणसे आहेत ते जगण्याचे नवे बळ देतात. नियतीच्या
कसोटीत कुणीही परिपूर्ण नसते, हे सत्य मानून आहे जगत आहोत. सर, तुमची समाजाला आजही
गरज आहे. ती पोकळी भरु शकत नाही हे शल्य आहे. राम शेवाळकर सर आपल्या स्मृतीस
प्रणाम ! – भास्कर कदम, नांदगाव

Comments
Post a Comment