भाई गेले रे सोडूनी आकाशाला !
मानवतावादी विचारांनी आकाश व्यापून टाकणारे भाई वैद्य आकशात विलीन झाले. आम्ही राष्ट्र सेवा दलाचे सैनिकच नव्हेतर असंख्य समाजवादी, मानवतेचे पुजारी पोरके झालो. ``बोले तैसे चाले, त्याची वंदावी पाऊले`` या उक्तीप्रमाणे भाई यांची वाटचाल होती. त्यांचा समाजवाद कृतीशील होता. आचार आणि विचारात त्यांनी कधी फरक केला नाही. विनम्र होवून पायाला हात लावावा असे थोर व्यक्तिमत्व आता अस्तंगत होत आहेत. भाईंचे शरीर थकले होते. अनेक व्याधींनी त्यांना विळखा घातला होता. जगण्या-मरणाच्या लढाईत अखेर मरणाने बाजी मारली. आजच्या काळाला भाईंची गरज असतांना ते सोडून गेले. काळ कुणासाठीही थांबत नाही, हेच शाश्वत सत्य आहे. स्वातंत्र्य चळवळीचे बाळकडू भाईंच्या अंगात पुरते भिनलेले होते. त्यांच्या नसानसात देशभक्ती होती. दि. २ एप्रिल  २०१८ रोजी सायंकाळी त्यांचा श्वास थांबला, समाजवाद व मानवता हाच `श्वास` मरते दमतक राहिला होता. ``भाई गेले रे सोडूनी आकाशाला`` ह्याच शोकभावना दाटून आल्या.
आमचे भाई म्हणजे भालचंद्र सदाशिव वैद्य. भाई वैद्य यांच्यामुळेच `भाई` या शब्दाचा दरारा आणि दहशत हा फरक कळला. भाईंचा दरारा होता, दहशतवालेही त्यांना घाबरून असत. महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री असतांना त्यांना लाच देणाऱ्या `भाई`स त्यांनी पकडून दिले होते. आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार मानला जात आहे. देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला लाजलज्जा राहिलेली नाही. त्यामुळे भाईंचे कार्य बोले तैसे चाले, असे होते. विचारांमध्ये स्पष्टता होती. त्यासाठी त्यांनी कधीही तडजोड स्वीकारली नाही. कार्यकर्त्यांसाठी भाईंकडे छोटा-मोठा असा भेदभाव नव्हता. फार सरळमार्गी होते. भाई म्हणजे जेष्ठ समाजवादी विचारवंत, साहित्यिक, अनेक चळवळीचे बिनीचे शिलेदार, यास्तव अनेकदा तुरुंगवासही भोगलेले, लाठ्याकाठ्या यांचा मार सहन केलेले, तसेच माजी गृह राज्यमंत्री असलेले; परंतु याचा कुठलाही अविर्भाव-अहंगंड त्यांचेत नव्हता. त्यांचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद होता. लहान-मोठ्यांचे ते भाईच होते.
भाई वैद्य यांच्या महान कार्यावर मी पामराने काय लिहावे. माझे शब्द त्यांच्या कार्यापुढे तोकडेच पडतील याची जाणीव मला आहे. भाईंचा प्रत्यक्षात सहवास लाभला हे मी माझे भाग्य समजतो. राष्ट्र सेवा दल व आमचे साप्ताहिक समर्पित हे दोन घटक त्यासाठी कारणीभूत ठरले होते. एसएम अण्णा नंतर भाई आणि यदुनाथजी थत्ते, राम शेवाळकर अधिक प्रिय होते. यदुनाथजी व रामभाऊ साहित्याच्या तसेच वक्तृत्वाच्या प्रांतात अग्रेसर होते. भाईंनी चळवळ, राजकारण, समाजकारण, साहित्य, वक्तृत्व या सर्वच प्रांतावर अधिराज्य गाजविले होते. सर्वच क्षेत्रात भाईंचा एक वेगळा दबदबा होता. या सर्व क्षेत्रात त्यांना आदराचे स्थान होते. त्यांचे वागणे, बोलणे, व्यक्तिमत्व याला वेगळीच धार व चमक होती. त्यांच्या अक्षराला एक वेगळेच वळण होते. त्यांच्या विचाराबरोबरच अक्षराशी माझी अधिक जवळीक झाली होती. कारण समर्पितच्या दिवाळी अंकात त्यांचा विशेष एक लेख असायचा. पोस्टमन यांनी टपाल हाती देताच भाईंचा लेख आला हे लगेच कळायचे. पांढऱ्या शुभ्र कागदावर त्यांचे टिपिकल वळणदार अक्षर कंपोजला घेतांना मला विशेष आनंद व्हायचा. विचाराबरोबरच अक्षर एक वेगळ्याच वास्तवाच्या दुनियेत घेवून जायचे. त्यांच्या लेखाचा पहिला वाचकच मी असायचो. अलीकडच्या दिवाळी अंकात त्यांचे लिखाण झाले नाही. मावळचे  प्रभाकर ओव्हाळ यांनी लोकशाहीर आत्माराम पाटील यांच्या जीवनचरित्र लिहिले. या ग्रंथास भाईंची प्रस्तावना शब्दबद्ध केली होती, ती पाठविली. समर्पितच्या दिवाळी अंकात भाईंचा लेख नाही असे कधी झालेच नाही, इतके भाई आणि समर्पित असे अतूट नाते झाले होते. अशाप्रकारे भाई कार्यकर्त्याचे मन-भावना जपायचे.
भाई ५  फेब्रुवारी २००६ रोजी शिक्षकनेते व राष्ट्र सेवा दल सैनिक कचेश्वर बारसेसरांच्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमास नांदगावी आले होते. दुपारच्या जेवणानंतर मी सायंकाळच्या जेवणासाठी माझेकडे या, असे म्हणताच त्यांनी तत्काळ होकार दिला. जेवण झाल्यानंतर विविध विषयावर खूप गप्पा झाल्या. यावेळी माझ्या दोन्ही कन्या क्षितिजा व विशाखा तसेच कामगार नेते व साने गुरुजी कथामाला  नांदगावचे पंडितराव गायकवाड हेही हजर होते. अलिकडे वर्षभरापूर्वी नाशिकच्या सेवा दलाच्या कार्यक्रम प्रसंगी भेट झाली. त्यावेळीही त्यांची तब्बेत नरम-गरमच होती. परंतु नव्वदीतही विचार व बोलण्यात तीच धार तोच आवेग होता. तीच त्यांची शेवटची भेट ठरली. आजही त्या आठवणी ताज्या आहेत. भाई आमच्या कुटुंबातील एक घटक झाले होते. त्यांच्या जाण्याचे दुखः मोठे आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. `सेवा दल बढाना है - भुलो मत` या त्यांच्या आचार-विचारांचे अनुकरण करणे हीच त्यांना खऱ्याअर्थाने श्रद्धांजली ठरेल. `भाई गेले रे सोडूनी आकाशाला, जपू या त्यांच्या विचाराला` असे म्हणत भाईंच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली !     - भास्कर कदम, नांदगाव.      


               
      

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

भोंदूबाबा आणि संसार ...