शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांच्या `शिवाश्रम` प्रकल्पास हातभार लावू या !
शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे हे सध्या शिवाश्रम प्रकल्पाचे निर्मितीसाठी झपाटले आहे. आपल्या कार्यक्रमातील बिदागीचा बहुतांशी भाग या प्रकल्पासाठी खर्च करीत आहे. शिवाश्रम प्रकल्पाचे माध्यमातून अपंग, वृद्ध, कलावंत यांचे उदरनिर्वाहासाठी निवासी व्यवस्था करणार आहेत. आपल्या बिरादरांना स्वाभिमानाने जगता यावे हा दृष्टीकोन डॉ. तनपुरे यांचा आहे. डॉ. तनपुरे हे अपंग आहे. त्यांनी आपली मराठमोळी कला सातासमुद्रापार पोचविली आहे. डॉ. तनपुरे यांनी शारीरिक व आर्थिक परिस्थितीवर मात करून मराठी संगीत शिवायनच्या माध्यमातून अटकेपार झेंडा फडकाविला आहे. परिस्थितीच्या यातना त्यांनी भोगल्या आहेत. त्या आपल्या सहकारी बांधवांना भोगाव्या लागू नयेत, अशी त्यांची आंतरिक इच्छा आहे. त्यासाठी तब्बेतीची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांचे हे कार्य अलौकिक होय. त्यांच्या या कार्याचे आम्हाला पत्रकारीतेबरोबरच लोककलेचे अभ्यासक म्हणून नेहमीच अप्रूप वाटले आहे.
डॉ. विजय तनपुरे यांच्या पहाडी आवाजाचे गारुड आमच्या मनावर नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेच्या अधिवेशनप्रसंगीच झाले होते, ते आज तागायत कायम आहे. त्यावेळी परशुराम सायखेडकर समोरच्या मोकळ्या जागेत झालेल्या खुल्या शाहिरी कार्यक्रमात एक पोरसवदा अपंग शाहीर डफावर थाप मारून पोवाडा सादर करीत होता. त्याच्या पहाडी आवाजाच्या पोवाड्याने श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. त्यावेळी जेष्ठ साहित्यिक व सकाळचे संपादक उत्तमराव कांबळे आणि आम्ही एका कोपऱ्यात उभे राहून पोवाडा ऐकत होतो. ``याला उपजत असलेला शाहिरी आवाज म्हणतात`` असे उत्फूर्त उद्गार उत्तमरावांनी काढले. त्याचवेळी हा शाहीर आपल्या भविष्यात काहीतरी तरी चमत्कार (बुवाबाजीचा नव्हे) घडवील याची पुसटशी जाणीव झाली. आज ते चित्र बऱ्याचअंशी त्यांच्या कर्तृत्वाने तसेच सामाजिक जाणीवेने स्पष्ट होवू लागले आहे.
शिवशाहीर तनपुरे ज्या समाजाने आपल्या जीवनाला, आवाजाला टेकू दिला, त्याची जाणीव अतिशय विनम्रपणे आपल्या मनात ठेवतात. परिस्थितीशी संघर्ष करीत शिवशाहीर तनपुरे यांची पावले अपंगत्वावर मात करीत वाटचाल करीत आहे. आपल्या या वाटचालीत समाजाच्या उपेक्षित घटकाला सोबत घेवून चालत आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती बळावरच हे सगळे शक्य आहे. शिवशाहीर तनपुरे यांच्याठायी ती पुरेपूर आहे. त्यांच्या या कार्याला, जिद्दीला खरेतर सलामच केला पाहिजे. नगर जिल्हा हा खरेतर साखर निर्मितीचा जिल्हा. या जिल्ह्यातील राहुरी येथील या शाहिराने आपल्या डफाचा डंका चौफेर पिटला आहे. पहाडी आवाज बरोबरच त्यांच्या आवाजात एक विशिष्ट प्रकारचा गोडवाही आहे. संगीत शिवचरित्र कथन करतांना तो प्रत्ययास येतो.
डॉ. विजय तनपुरे यांचे संगीत शिवायन ऐकण्याचा योग दि. २३/४/२०१८ रोजी आला. नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील चोळकेवाडी या गावी आला. शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवन चरित्रावर ७ दिवस शिवकथा सादर करीत होते. छत्रपती शिवाजीराजे यांचे जीवनचरित्र एक संपूर्ण विचारधारा आहे. महाराज सर्व गुणसंपन्न अलौकिक असे स्वराज्य, सुराज्य निर्माण करणारे रयतेचे राजे होते. राजेंच्या पराक्रमाचा इतिहास शिवशाहीर तनपुरे आपल्या खास शैलीत कथन करीत होते. श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. हजारो श्रोत्यांना शिवचरित्राने भारावून टाकण्याचे सामर्थ्य त्यांना उपजत लाभले आहे. माझेही मन काहीवेळ शिवकाळात रमले होते. यावेळी माझेसोबत येवल्याचे बाळासाहेब सोनवणे, प्रा. सुरेश नारायणे होते. तेही या शिवायनाने भारावून गेले.
शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना नांदगाव येथे दि. २५/०५/२०१८ रोजी येण्याचे निमंत्रण यावेळी आम्ही दिले. त्यांनी ते तत्काळ स्वीकारले. संपूर्ण श्रोतुवर्गाला त्यांनी आमचा परिचय करुन दिला. आमचा यथोचित सन्मान केला. शिवशाहीर तनपुरे यांच्या नसानसात महाराजांचा आदर्श रुजला आहे. या माणसाच्या कर्तृत्वाला मुजरा करण्यासाठी त्यांच्या शिवाश्रम प्रकल्पाला मदत करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या या प्रकल्पास आपण सढळ हस्ते हातभार लावू या, असे आवाहन करीत आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्याल अशी खात्री बाळगतो.
-    भास्कर कदम, (माजी नगराध्यक्ष, नांदगाव)      

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

भोंदूबाबा आणि संसार ...