अण्णा आणि गुळाचा चहा !
अण्णा आणि गुळाचा चहा !
साहेबराव आनंदा आहेर उर्फ साहेबराव पाटील. अण्णा
या टोपण नावाने सर्व परिचित. साहेबरावअण्णा म्हटले की एक खानदानी रुबाबदार
व्यक्तिमत्व डोळ्यासमोर तरळते. साहेबरावअण्णा मावळतीकडे कलू लागलेला सूर्य आहे.
याची पुरेपूर जाणीव त्यांना आहे. त्यांनी नुकतीच वयाची पंच्याह्त्तरी ओलांडली आहे.
अण्णांचे शरीर थकले तरी मन आजही तरुण आहे. बोलण्यातला तो उत्साह आजही कायम आहे. साहेबरावअण्णा
म्हणजे माणसाळलेला माणूस. त्यांनी जमविलेल्या गप्पांचा फडाला एक वेगळीच ग्रामीण चव
आहे. चवीचा विषय आला म्हणून सांगतो. काल (दि. २ मे २०१८) त्यांच्याकडे भालूरला
विठोबा आहेर यांच्यासोबत सहजच गेलो. विठोबा म्हणजे भालुरचा त्याकाळचा सर्वात तरुण
सरपंच. साहेबरावअण्णा यांचा तो तत्कालीन विरोधक. आता मात्र त्याने अण्णाशी जुळवून
घेतले आहे. तसे माझे साहेबरावअण्णा
यांचेकडे नियमित जाणे-येणे आहे. अनेकदा माजी आमदार अनिल आहेर तसेच आमदारकी सोडून
सर्व राजकीय पदे मिळविलेले जेष्ठ नेते कारभारी पाटील, खूप कमीवेळा बापूसाहेब कवडे
यांच्यासोबत मी असायचो. साहेबरावअण्णा हे माझ्या जेष्ठ मित्र व सल्लागारापैकी एक
आहेत. त्यांचं छोटेखानी फार्महाउस हा राजकीय गप्पांचा अड्डाच आहे. तालुक्यातील अनेक
राजकीय निर्णय येथे झाले आहेत. त्या निर्णयांचा मी साक्षीदारही राहिलो आहे. आज
काहीशी वर्दळ कमी आहे. त्याबद्दल त्यांना ना खेद ना खंत. आजही आलेल्या अतिथींचे आदरातिथ्यात
ते काहीही कमी पडू देत नाही. साहेबरावअण्णा यांच्या हातालाही एक वेगळीच चव आहे. त्यांच्या
हातची भाजी खाणे काही औरच आहे. कारण शेवभाजी सर्व परिचित आहे; परंतु भेळची भाजी हा
अफलातून प्रकार होता. त्यांनी बनविलेली भेळची भाजी आजही आठवणीत आहे. कालही मला
त्यांनी आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेला गुळाचा चहा पाजला. दुधाशिवाय बनविनेत आलेला
असा चहा आजवर कुठेही मला कुठेही मिळालेला नाही. चहाबरोबर त्यांच्या मनाचा निर्मळ
गोडवाही त्यात होता.
आदरणीय शरद पवार साहेबांवर साहेबरावअण्णा यांची
नितांत श्रद्धा. नांदगाव तालुक्यात पवारसाहेब यांचे साहेबरावअण्णा सच्चे पाठीराखे.
पवारसाहेब यांच्या प्रत्येक राजकीय स्थित्यंतरात साहेबरावअण्णा यांनी त्यांची सोबत
केली. पुलोदच्या काळात साहेबरावअण्णा यांचा रुबाब चांगलाच वाढला होता. विधानसभेचे
तिकीट त्यांना देण्याचे निश्चित झाले, परंतु नंतर ते बदलण्यात आले. त्याचे दुखः आजही
त्यांच्या मनात आहे. पडण्यासाठी तरी ते मिळाले असते तरी मला आनंद वाटला असता, असे
ते बोलून दाखवितात. आजही ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच आहे. तसे साहेबरावअण्णा यांच्या
वाट्याला पंचायत समितीचे सभापतीपद, जिल्हा परिषदेचे सदस्य, एमव्हीपीचे संचालकपद
इत्यादी राजकीय महत्वाची पदे आली. ती त्यांनी रुबाबातच गाजविली.
साहेबरावअण्णा म्हणजे मोकळ्या मनाचा तसाच फटकळ
स्वभावाचा माणूस. अनेकदा वाईटाचे वाटेकरी त्यांना केले गेले. परंतु मनात फारसा राग
त्यांनी कधी ठेवलाच नाही. बोलून गेल्यावर मी असे बोलायला नको होते, असे त्यांना वाटायचेसुद्धा.
माणूस आपल्या जवळून तुटल्याचे दुखः आजही त्यांना होते. साहेबरावअण्णा तसे फारसे खोल
डावपेची नाही. त्यामुळे बरेचदा त्यांचे नुकसानही झाले. चारचौघात ठरले की ते
घडविण्यात ते आघाडीवर असायचे. तेव्हा निवडणुका संपल्या की मनभेद नसायचे. विरोधकांशी
चांगुलपणा ठेवला जायचा. आज असे घडतांना दिसत नाही ही खंत असल्याचे ते बोलून
दाखवितात. आज निवडणुका कामाभोवती फिरण्याऐवजी पैश्याभोवती फिरत आहे, मान मर्यादा
ठेवल्या जात नाही. आजचे काही तरुण वयाचा मान ठेवत नाही. त्याचा नेमका अन्वय शोधणे
कठीण असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दोष नेमका कुणाचा आहे. आम्हीच कमी पडत
आहोत. दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही, असेही ते नमूद करतात.
साहेबरावअण्णा यांनी गप्पांचा फड रंगविला होता.
बोलता बोलता ते अंतर्मुखही झाले होते. उमेदीचा काळ हातातून निघून गेला आहे.
त्याकाळात माझ्या हातूनही चुका झाल्यात, याची स्पष्ट कबुलीही त्यांनी दिली. अंधार
पडू लागला. त्यांनी नेहमीप्रमाणे जेवणाचा बेत केला. स्वत:च्या हाताने भाजी केली.
आजही तीच चव होती. मन मात्र भूत, वर्तमान, भविष्य काळात भटकून आले. निघतांना अण्णाबरोबरच
भालूरचेच संजय आहेर, विठोबा आहेर तसेच अण्णांचा मुलगा दिनू, नात छकुली, नातू यश यांचा
निरोप घेतला. अश्याप्रकारे बीन दुधाच्या गुळाच्या चहा पे आमची चर्चा झाली.
- - भास्कर कदम (माजी
नगराध्यक्ष, नांदगाव)

Comments
Post a Comment