भास्कर कदम : २५ मे २०१८ एकसष्टीपूर्ती समारंभ सायंकाळी ६ वा. नांदगाव : अगत्यपूर्वक या !!
समतेच्या विचाराने
लेखणीला धार आली !
आत्मनिवेदन – भास्कर
कदम
माझ्या जीवनाची कहाणी अत्यंत साधीसरळ आहे. एका अल्पशिक्षित तसेच
पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सर्वसामान्य माणसाची
कहाणी आहे. या कहाणीला अनेक वळणे, कंगोरे तसेच खाचखळगे आहेत. जसा जगलो तसा तुमच्या
पुढे शब्दात मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. सर्वसामान्य माणसाने कितीही संकटे
आली तरी ना उमेद होवू नये यासाठीचा खरा हा प्रपंच आहे. मोठा माणूस म्हणजे नेमके
काय? हा प्रश्न मलाही पडला आहे. पैश्याने, पदाने, वयाने, मानाने असे विविध प्रकार
समाजात दिसून येतात. खरे तर माणूस मनाने मोठा असावा, अशी जाणीव वयपरत्वे जवळपास
सर्वांनाच होवू लागते. आपण समाज, आप्तस्वकीय व इतरांपासून काय शिकलो, शिकल्यानंतर
समाजाला काय दिले, हे प्रश्न महत्वाचे वाटू लागतात. समाजशील जगण्यातून या
प्रश्नाची उत्तरे मिळू लागतात. शिक्षण, संघटन, संघर्ष या त्रीसूत्रानुसार जीवनाची वाटचाल
चालू आहे. सुरवातीला शाळेने मला शिकविले. समाजाकडूनही शिकलो, अजून खुपकाही शिकायचे
आहे, शिकता शिकता शिकवायचेही आहे.
माझ्या शाळेची कथा मोठी मजेशीर आहे. माझी आई सखुबाई मला म्हणायची तू
बाबासाहेबांनंतर गाडगेबाबा गेले त्याच्या तीन दिवसांनी झाला. मी नगरपालिकेत जन्म
नोंदीचा तपास केला. मला नोंदच सापडली नाही. मला शाळेत दाखल केले तेव्हा माझी आई
हिने मास्तरला सांगितले होते की, आमचा पाळणा दोन-दोन वर्षांचा आहे. माझ्यापेक्षा
मोठा भाऊ सुधाकर त्याच शाळेत होता. मास्तरने त्याच्या जन्मतारखेत दोन वर्ष
मिळविली. ती तारीख २५ मे ही होती. आजही कागदोपत्री माझी जन्मनोंद २५ मे १९५७ अशीच
आहे. विशेष म्हणजे माझ्या धाकट्या बहिणीचीही जन्मनोंद २५ मे चीच आहे. अशाप्रकारे
एकाच कुटुंबात आम्ही तिघे भावंडे २५ मे रोजी जन्मल्याची शालेय नोंद आहे. आज आम्ही
तीच खरी मानतो.
आमचे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्याच शाळेत झाले. आमच्या शाळेत दर
गुरुवारी शेण गोळा करावे लागत असे. शेणाने सारवलेल्या वर्गात आम्ही सवंगडी आनंदाने
बसत असू. पाटी आणि पेन्शील यावर ४ थीपर्यंत अक्षरे गिरविली. त्यानंतर पेपर आणि पेन
हाती आला. तेच माझ्या जीवनाचे मुख्य आधार बनले. खरेतर नांदगावच्या व्ही. जे.
हायस्कूलमध्ये माझ्या जडण-घडणीला आकार येवू लागला होता. अक्षर आणि शब्द यांचा छंद
मला इथेच जडला. या शाळेत मला कधीही बक्षीस मिळाले नाही. त्यावेळी मला बक्षीस
घेणाऱ्यासह देणाराचाही हेवा वाटायचा. परंतु पेन आणि पेपरच्या सामर्थ्याच्या बळावर
त्याच शाळेत माझ्याहस्ते बक्षीस वितरण झाले. हा माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा
क्षण होता.
माझा महाविध्यालयीन प्रवास खूपच चांगला झाला. चांगले गुरु मिळाले,
चांगले मित्र मिळाले. कॉलेजमध्येच मला खऱ्याअर्थाने माझ्या अस्तित्वाची जाणीव
झाली. अभ्यासासोबत इतर कार्यक्रमात भाग घेवू लागलो. तेथेच माझ्यात स्टेज डेअरिंग
निर्माण झाले. निबंध, काव्यवाचन, नाटक, एकांकिका यात भाग घेवू लागलो. अनेक बक्षिसे
मिळविली. माझ्यातल्या पत्रकारितेला येथेच धुमारे फुटले. घरात पत्रकारितेचा वारसा
होताच. कॉलेजला असतांनाच बातमीदारी करु लागलो. त्यामुळे समाजात तसेच सभा समारंभात स्थान
मिळू लागले. सन्मानही मिळू लागला.
नामदेव कृष्णाजी कदम माझे वडील. त्यांचा बूट-चप्पलचा पारंपारिक
व्यवसाय. लहानपणी आम्ही चारही भावांनी बूट चपला पॉलीश केल्या. वडिलांना मदत केली. वडिलांना
राजकारणाचा छंद जडला. त्यात ते नगरसेवकही झाले, परंतु कुटुंबाची काहीशी वाताहत झाली. मोठा भाऊ
सुरेश रोजगाराच्या शोधासाठी मुंबईला गेला. तेथूनच आम्ही पारंपारिक व्यवसाय सोडला.
आपत्तीने आम्हाला वेगळा मार्ग दाखविला. माझा रमेश नावाचा भाऊ माझ्याआधी
पत्रकारितेकडे वळला. त्यातून आम्ही छोटासा प्रिंटींग प्रेस टाकला. त्याने स्वत:चे
समर्पित नावाचे साप्ताहिक सुरु केले. त्याआधी तो वेगवेगळ्या दैनिकात लिहू लागला
होता. त्यातून त्याची लोकशाहीर अमर शेख यांच्याशी भेट झाली. अमर शेख यांचेमुळे
त्याचे जीवनच बदलून गेले. आज तो महाराष्ट्रातील शाहिरांचा प्रमुख आधारस्तंभ बनला
आहे. यामुळे त्याचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रव्यापी झाले. अ. भा. मराठी शाहीर
परिषदेचा तो मुख्य विश्वस्त आहे. आजही तो त्यांचेत कार्यरत आहे. शाहीर अमरशेख
यांच्या प्रमाणेच तो शाहीर साबळे, आत्माराम पाटील, मधुकर नेराळे, सुबल सरकार
यांच्या कुटुंबातील एक सदस्य झाला. महाराष्ट्रभर मित्र परिवाराचे जाळेच उभे झाले.
रमेश नामदेव कदम हे नाव सर्वत्र परिचित झाले.
आमच्या साप्ताहिक समर्पितने पद्मश्री क्रांती शाह यांच्या युवक
बिरादरीचे मुखपत्र म्हणून काम केले. त्यानिमित्ताने मला वृत्तांकन करण्यासाठी
मुंबईतील शिबिरांना जावे लागले. त्यातून माझ्या व्यक्तिमत्वाला, विचारांना योग्य
दिशा मिळाली. समर्पितमुळे थोरा-मोठ्यांचा सहवास लाभला. ध्येयधुंद साप्ताहिक अशी समर्पितची
ओळख होती. पुरोगामी विचार हाच आमचा मुख्य प्रवाह होता. त्याचे कारण की, बालपणीच
आमच्यावर साने गुरुजी व राष्ट्र सेवा दल यांचे संस्कार घडले होते. ती मूस आजही
कायम आहे. भाई वैद्य, यदुनाथ थत्ते, राम शेवाळकर, ज्योती अमर शेख, मलिका, नामदेव
ढसाळ यासारखी नामवंत मंडळी बरोबरच महाराष्ट्रातील प्रथितयश लेखक, विचारवंत समर्पितच्या अंकात लेखन करीत असे. समर्पितने आम्हा दोघा
भावांना वेगळी ओळख दिली. समर्पितने अनेक नवलेखक, कवी, पत्रकार घडविले. आज समर्पित
बंद पडलेय याचे दु:ख आहे.
लोकमत, सकाळ, देशदूत, गावकरी या जिल्हा दैनिकात मी प्रतिनिधित्व केले.
सर्वाधिक काळ लोकमतचे काम केले. त्यावेळी आदरणीय मधुकर भावेसाहेब यांचे प्रत्यक्ष
मार्गदर्शन लाभले. माझे समकालीन किरण अग्रवाल, शैलेन्द्र तनपुरे, जयप्रकाश पवार,
सुधीर कावळे, किरण लोखंडे हे पत्रकार मित्र आज जिल्हा दैनिकाचे निवासी संपादक
आहेत, याचा मला अभिमान वाटतो. अशारितीने पत्रकारिता आमच्या नसानसात भिनली आहे.
शब्दांवर प्रेम जडले. आमच्या शब्दांनी काहींच्या जीवनात आनंद फुलविला तर काहीजण
दुखावलेही. आता सोशल मिडीयाचा वापर करतो. ब्लॉग लेखन करतो. त्याला मिळणारा प्रतिसाद
पाहून आजही लेखणीला समतेच्या विचाराची धार आहे, याची जाणीव होते.
माझा राजकारण प्रवेश अपघाताने झाला. पत्रकारितेमुळे अनेक राजकारणी
यांचा माझा मैत्रीचा संबंध आला. आमदार अनिलदादा आहेर यांचा व माझा ते वकिलीचा
व्यवसाय करायचे तेव्हापासूनचा संबंध. आमचा मित्र परिवार मोठा. २००२ मध्ये
नगरपालिकांच्या थेट निवडणुका झाल्या. नांदगाव नगरपालिकेत आरक्षण पडले. त्यात
आरक्षणाने मला थेट निवडणुकीची संधी मिळाली. पहिल्या प्रयत्नात माझा पराभव झाला.
पोट निवडणुकीत त्याच नांदगावकर जनतेने मला मोठ्या बहुमताने निवडून दिले. मी माझ्या
कुवतीप्रमाणे कामकाज केले. हे नांदगावकरांचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही.
ज्यांनी पाडले त्यांनीच डोक्यावर घेतले. याचा आनंद मोठा होता. त्या सर्वांच्या
ऋणात मी कायम राहू इच्छितो.
नांदगावमध्ये समाजकारण, राजकारणाबरोबरच सांस्कृतिक चळवळ रुजविण्याचा
प्रयत्न केला. समता मंचच्या माध्यमातून क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन असा ९ ते १५
ऑगस्ट सप्ताह साजरा केला. त्यालाही नांदगावकरांनी मोठा प्रतिसाद दिला. यात पहिलीपासून
ते जेष्ठ नागरिकांचा स्पर्धक म्हणून सहभाग असायचा. ते सात दिवस देश भक्तीने
मंतरलेले असायचे. तो कार्यक्रम थांबला, याची खंत आजही उराशी आहे. कुणी तरी ही
परंपरा पुढे चालवावी अशी अपेक्षा आहे.
मी आयुर्विमा कंपनीत विकास अधिकारी होतो. चांगला पगार होता. नोकरीत
माझे मन रमलेच नाही. परंतु ताबेदारी आवडली नाही. लोकमतच्या टेबलवर काही महिने काम
केले. तेही सोडले. घरातील सर्व मंडळी नाराज होती. हा माझा स्वभाव दोष होता. आज
त्यांनीही तो मान्य केला. पत्नी आणि दोन मुली असा नेटका प्रपंच आहे. पत्नी संगीता
दूरसंचारमध्ये नोकरीस आहे. क्षितिजाने पत्रकारितेत करीयर करणेसाठी येमसीजे हे
पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ती आज मुंबईमध्ये पब्लिक रीलेशनच्या
नामांकित कंपनीत जॉब करतेय. विशाखाही मुंबईमधील नायर हॉस्पिटलमध्ये फिजियोथेरीपीचे
पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव नातेवाईकांचा गोतावळा मोठा
आहे. माझ्या जीवनाला आकार देण्यास त्यांचाही मोठा हातभार आहे.
आमचे मित्र विश्वशाहीर डॉ. विजय तनपुरे हेही समर्पित परिवारातील एक
घटक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर
सातासमुद्रापार आपला पहाडी आवाज पोचविला आहे. ते अपंग आणि वृध्द कलावंत यांचेसाठी
शिवाश्रम प्रकल्प उभारत आहे. कोट्यवधी रुपये खर्चाची ही संकल्पना आहे. त्यास आपण
आपल्या कुवतीनुसार हातभार लावू या, असे जाहीर आवाहन एकसष्टीच्या या समारंभात करून
शाहीर तनपुरे यांचा संकल्प सिद्धीस जावो, अशी प्रार्थना करतो.
तसेच याप्रसंगी माझा भाऊ सुधाकर तसेच सहायक कामगार आयुक्त असलेले माझे
मित्र इकबाल शेख यांचे बरोबरच आमचे पत्रकार मित्र विजय कांगणे, प्रभाकर मुराळकर,
उल्हास रहाणे, सुधीर रांगोळे, रत्नाकर दाभाडे, रविंद्र पैठणकर आणि बापू आहेर हे
आम्हाला अकाली सोडून गेले त्यांचीही आज प्रकर्षाने आठवण होत आहे. त्यांना अभिवादन
करतो.
नांदगावने मला मानमरातब सारेकाही दिले आहे. काही उणे असेल तर
ते माझे आहे. आयुष्यात माझ्या हातून काही चुकाही झाल्या असतील तर मायबापहो मला
मोठ्या मनाने माफ करा. हा सोहळा केवळ माझ्या कौतुकाचा होवू नये ही माझी निर्मळ
भावना आहे. यासाठी समाजात ज्यांनी चांगले काम केले आहे त्यांचेपैकी काहींचा
प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करीत आहे, तोही गोड मानून घ्यावा. खरे तर खूपजणांचे
माझ्यावर उपकार आहेत. काही नावे घेतांना काहींची राहून जाण्याची शक्यता आहे, तसे
होवू नये म्हणुन मी नामोल्लेख केलेला नाही. याबद्दल मला क्षमा असावी.
आत्मनिवेदनाचा समारोपप्रसंगी -
सुख दु:खाच्या झुल्यावर | एकसष्टीचा ताळेबंद मांडतांना
हृदयात खूपकाही दडलय...
पांगुळ गाड्याच्या आधाराने | ठेचाळत धडपडत सावरत
दोन पावले चाललोय...
मजल दरमजल करीत | स्वत:ची वाट मळतांना
आजवर इथवर आलोय...
बुद्ध कबीर रविदास | ज्ञानोबा तुकाराम शिवराय
पोथ्यांची पारायणे झालीय...
फुले शाहू आंबेडकर | स्वातंत्र्य समता बंधुता
विचार वाटेत भेटलेय...
सूर्याचे तेज न्याहळीत | ऊन पाऊस सावलीत
शब्द सोबतीला आलेय...
भाव भावनांच्या भाऊगर्दीत | विचारांच्या दिशेने
जातांना
लेखणीच जीवनाधार झालीय...
शब्दांचीच केली तलवार | मारिले षडरिपू आरपार
भेद्निती आता संपलीय...
जातीयतेच्या जोखडात बंदिस्त | झापडबंद निद्रिस्त
समूहाच्या
अंधश्रद्धेला मूठमाती दिलीय...
समतेची मशाल घेवून | अंध:कार नाहीसा करण्यास
काटे तुडवीत निघालोय...
मानवतेची पताका फडकावून | आपुल्या सोबतीने
अंतिमध्येयाची
जीवननौका पार करायचीय...
- भास्कर कदम (माजी नगराध्यक्ष,नांदगाव)

Comments
Post a Comment