मित्र हा मित्रच
असतो !
मित्र या शब्दात
सारे काही सामावलेले असते. तसा हा शब्द कुणाच्याही कवेत न मावणारा शब्द आहे. खरे
तर यात गुणदोषांचे बेमालूम मिश्रण असते. लहानपणी मैत्रीचा खेळ मजेशीर असतो.
मोठेपणी त्यात फारसा फरक पडलेला नसतो. लहानपणी मैत्रीचा भाव निरागसपणे व्यक्त केला
जातो; तर मोठेपणी त्याला वेगळीच झालर लावल्या जाते. काही भावना व्यक्त केल्या
जातात, काही भावना व्यक्त न होताच बरेच काही सांगून जातात. मित्राच्या बाबतीत पु.
ल. देशपांडे यांनी फार छान सांगितले आहे, ते म्हणतात ``ज्याच्या जवळ मनातील भाव
व्यक्त करताना लज्जा, संकोच वाटत नाही. खोटे बोलावसे वाटत नाही. फसवावेसे वाटत
नाही. पापपुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही. ज्याला आपला पराक्रम कौतुकाने
सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही.
ज्याच्या सुख दुखःशी आपण एकरूप होवू शकतो तो खरा मित्र. मित्र ही जीवनातील आवश्यक
गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मित्र हवाच.``
``मित्र हा मित्रच
असतो``, असे माझे मित्र माजी आमदार अनिलदादा आहेर माझ्या एकसष्टीपूर्ती (दि. २५ मे
२०१८) समारंभातील भाषणात म्हणाले. या एकाच वाक्यात सारे काही आले आहे. मित्र हा
गुणदोषांसह स्वीकारला जातो. मैत्रीतील भांडणही मजेशीर असते. लहानपणी कट्टी – सो चा
प्रकार असायचा. मोठेपणी या भावना अबोला या स्वरुपात असतात. बेमालूमपणे हळूच कधी
संवाद सुरु होतो तेही कळत नाही. खरे तर हा मैत्रीतील आंबट–गोडचा प्रकार होय. हा
प्रकार सगळ्याच मित्रांच्या वाट्याला येतो. कुणीही याला अपवाद नसावे. अनिलदादा आणि
मी एकाच गल्लीत रहातो. ते वकिली व्यवसायाच्या निमित्ताने नांदगावकर झाले. ते मुळचे
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावचे. नांदगावात त्यांनी मित्रांचा मोठा फौज
फाटा जमविला. त्यात मीही एक आहे. माझ्या मित्रांमुळे मी आमदार झालो, असे ते
अभिमानाने सांगत. खरे तर निवडणुकीत अनेक घटक मदत करीत असतात. त्यापैकी मित्र हा एक
घटक होता. निवडणुकीसाठी बिनीचे शिलेदार लागतात. त्यात सर्व मित्रांनी ही भूमिका
त्यावेळी प्रामाणिकपणे निभावली.
खरे तर आज फक्त
मित्र या विषयावर बोलू या. त्याला कारणही तसेच आहे. १ जून रोजी अनिलदादा आहेर हे
वयाची साठी (६०) पूर्ण करीत आहे. माणसाच्या आयुष्यात हा मोठा टप्पा आहे. जवळपास
आम्ही सारे मित्र वयाची साठी ओलांडत आहोत. या कालखंडात अनेक उन्हाळे पावसाळे
पहिले; काही कालखंड दुष्काळाचा गेला. आता सिंहावलोकन केले पाहिजे, आत्मचिंतन केले
पाहिजे, असे म्हटले जाते. माणसाचे सरासरी वय यावर आता बरेच बोलले जाते. राजकारणात
तर साठीचा नेता तरुण मानला जातो. तसेच प्रत्येकाची शरीरप्रकृती भिन्न असते. त्याचे
परिणाम त्याच्या कार्यकर्तृत्व यावर होत असतात. या वयात दृष्टी आणि दृष्टीकोनात
फरक पडत असतो. मन आणि शरीर यांचेत कुरबुरी सुरु होतात. अपवादाने आदरणीय शरद पवार
यांचेसारखी माणसे यावर मात करु शकतात. सर्वांना हे शक्य नाही. या वयात वास्तवतेचे
भान ठेवून वाटचाल केली पाहिजे, अशीच सर्वसाधारण भावना आहे. म्हणजे नेमके काय केले
पाहिजे, हा प्रश्न महत्वाचा ठरतो. आपल्या भोवताली जे दृश्य स्वरुपात जे दिसते ते
वास्तव आहे का? अनेकदा भासमान स्थितीलाच आपण भुलतो, अशीही अवस्था होते. यातून
स्वतःला सावरणे महत्वाचे असते. ते अनुभवातून वयपरत्वे येते. खाचखळगे कळू लागतात.
साठीतल्या माणसाला याचा मोठा अनुभव असतो. तो स्वतःसह इतरांना सावरत असतो. या
अवस्थेला आम्ही आता आलो आहोत, त्याला अनिलदादाही अपवाद नाही. प्रत्येक निर्णय
विचारपूर्वक घेणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्टे आहे. त्यात कालहरण होते, असे आमचे
काही मित्र म्हणतात. चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा थांबलेले बरे, अशी त्यांची भावना
अनेकदा दिसून आली. आततायीपणा करण्यापेक्षा ही भूमिका योग्यच म्हणावी लागेल.
अनिलदादा यांना मोठा
राजकीय वारसा आहे. त्यांचे आजोबा शिवराम आहेर हे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष
होते. वडील गंगाधरअण्णा आहेर हे पंचायत समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य होते.
चुलते विजुमामा आहेर यांनीही राजकारणातील अनेक पदे भूषविली. संपूर्ण आहेर परिवाराचे
नांदगाव तालुक्याच्या राजकारणावर प्रभुत्व राहिले आहे. अनिलदादा यांच्या पत्नी
सुनीताताई ह्या जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. आता त्यांची आर्किटेक्ट असलेली
कन्या अश्विनी आहेर ह्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. राजकारणात आहेर घराणे
मतदार संघात महत्वाचे मानले जाते. त्यांच्या सहभागाशिवाय निवडणुकीला महत्व प्राप्त
होत नाही, हे वास्तव आहे.
अनिलदादा आहेर यांनी
केवळ राजकारणाला महत्व दिलेले नाही. समाजकारणाबरोबर धार्मिकतेकडे त्यांचा ओढा अधिक
आहे. श्रीक्षेत्र शनिमंदिर नस्तनपूर संस्थांनचे ते विश्वस्त तसेच सरचिटणीस आहेत.
मा. छगन भुजबळसाहेबांनी पर्यटन मंत्री असतांना या क्षेत्राचा विकास केला. अनिल
आहेर यांनी हा परिसर आपल्या देखरेखीखाली धार्मिक, आध्यात्मिक पावित्र्य जपत
निसर्गरम्य केला आहे. या जागृत स्थानाकडे भाविकांचा ओढा वाढू लागला आहे. अनिलदादा
यांच्या प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा मित्र परिवार वृक्षारोपणाचा
कार्यक्रम राबवीत आहे. अनिलदादा यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त १ जून २०१८ रोजी
सुशोभिकरण व वृक्षारोपणाचा कार्यक्रम नस्तनपूर येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित केला
आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले
आहे. चला आपणही या हरित चळवळीत सहभागी होवू या. तेच खऱ्या अर्थाने अनिलदादा यांचे
अभीष्टचिंतन ठरेल.
यंदाचे वर्ष आम्हा
मित्र परिवारासाठी वाईटच गेले. माजी आमदार जयंत ससाणे आणि अनिलदादा यांची मैत्री
जिवाभावाची होती. कर्करोगाने ससाणे यांना अकाली हिरावून नेले. जेष्ठ नेते आमचे
मार्गदर्शक कारभारी पाटील यांचे नुकतेच निधन झाले. अण्णा पाटील, शरद वाघ हेही
अकाली सोडून गेले. आपला वाढदिवस यावर्षी साजरा करु नये, असे मित्र परिवाराला
अनिलदादा यांनी सांगितले. परंतु काळ कुणासाठीही थांबलेला नाही, हेही वास्तव आहे.
मित्र मंडळाने नस्तनपूरच्याच कार्यक्रमात अनिलदादा यांचे अभीष्टचिंतन करावयाचे
ठरविले आहे. सोडून गेलेल्या मित्रांना चांगल्या कामाच्या माध्यमातून आदरांजली
अर्पण करु या. अनिलदादा यांना समाजसेवेसाठी दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो, अशा
शुभेच्छा देवू या ! - भास्कर कदम (माजी नगराध्यक्ष, नांदगाव)

Comments
Post a Comment