पत्रकारितेतील ते मंतरलेले दिवस !

गोष्टच पाव शतकापूर्वीची आहे. आज नेमकी ही गोष्ट आठवण्याचे कारणही तसेच आहे. लोकमतच्या नाशिक आवृत्तीचा आज रौप्य महोत्सव आहे. याचबरोबर मित्रवर्य जयप्रकाश पवार यांचा वाढदिवस आहे. वृत्तपत्राला व मित्राला एकत्र शुभेच्छा देतांना मनस्वी आनंद होत आहे. यानिमित्त मन थोडे भूतकाळात डोकावले.

या दोन्ही बाबत माझा निकटचा संबंध आहे. चार दशकातील पत्रकारितेतील एक दशक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत प्रतिनिधित्व केले. जयप्रकाश पवार यांचे बालपण व शिक्षण आमच्या नांदगाव येथे झाले. तसेच त्यांचा माझा खरा परिचय देशदूतमध्ये सुरेश अवधुतसाहेब यांच्यामुळे झाला. सोबतच पत्रकारिताही केली.

आज लोकमत नाशिक आवृत्तीचा रौप्य महोत्सव आहे. नाशिक लोकमत जळगाव येथून छापून येत होता. धो. ज. गुरव संपादक होते. श्रीकांत बेणी जिल्हा प्रतिनिधी होते. त्यानंतर जबाबदारी किरण अग्रवाल यांचेकडे आली. नाशिक आवृत्तीला पूर्णत्व आले ते विजय बाविस्कर यांचेकाळात. सुरवातीला नाशिकला आवृत्ती छापू लागली तेव्हा दिलीप तिखले वैगरे सिनियर मंडळी संपादकीय विभागात होती.

जेष्ठ संपादक मधुकर भावेसाहेब प्रत्यक्ष लक्ष ठेवून होते. नाशिक आवृत्तीचेच नव्हेतर संपूर्ण लोकमतचे संपादकीय त्यांनी काहीवेळा लिहिले म्हणण्यापेक्षा सांगितले. कारण अग्रलेख टाईप करणारा त्यांच्या सांगण्यानुसार त्याच स्पीडमध्ये टाईप करीत होता. भावेसाहेबांचे एक वैशिष्ट्ये होते, ठराविक मिनिटात ते अग्रलेख पूर्ण करीत. शब्दांवरील हुकमत आणि धारदारपणा मी स्वतः अनेकदा समक्ष अनुभवला. वाचकांच्या मनातले त्यांच्या अग्रलेखात उमटत असे.

मधुकर भावेसाहेबांच्या काळात जवाहरलाल दर्डा, विजय दर्डा, राजेंद्र दर्डा या मालकांची दखल-ढवळा ढवळ जवळपास नव्हतीच. मालक प्रत्यक्षात राजकारणात असतांना सुद्धा मालकांचा संपादकावर पूर्ण विश्वास असल्याचे चित्र त्यावेळी दिसून आले. आज काहीसे नव्हेतर बहुतांशी या क्षेत्रातील चित्र बदलेले दिसून येत आहे. आज राजकीय वातावरण बदलले की मालकाची भूमिका बदलते. वृत्तपत्रे समाज प्रबोधनाची साधने राहिलीच नाहीय, असे दिसून येत आहे.

स्वातंत्र्य पूर्वकाळात वर्तमानपत्रात जनजागृती-प्रबोधनास प्राधान्य होते. त्याकाळी हेतू आणि उद्दिष्ट-लक्ष स्पष्ट होते. आज सभोवतालचे वातावरण दूषित झालेय. त्यामुळे वर्तमानपत्र व्रत न राहता व्यवसायाचा म्हणण्यापेक्षा धंद्याचा प्रमुख मार्ग झालाय. याला कारणीभूत आधुनिकीकरण व भांडवली गुंतवणूक झालीय. त्यामुळे यासाठी अनेकदा व्यवस्थेशी मांडवली करावी लागते. प्रसार माध्यमाचा समावेशच इंडस्ट्रीत झालेला आहे. जे उद्योगपती यांना करावे लागते ते कमीअधिक प्रमाणात वृत्तपत्राच्या मालकांना करावे लागते. आव मात्र पतिव्रतेचा आणला जातो. यात काही सन्माननीय अपवाद आहेत.

लोकमत नाशिक आवृत्ती नाशिक जिल्ह्यात अल्पावधीत वाचकप्रिय झाली. त्यात मालक, संपादक, श्रमिक पत्रकार, कार्यालयीन कर्मचारी, विविध भागातील प्रतिनिधी, वितरक आणि सर्वात मोठा घटक म्हणजे वाचक यांचे योगदान मोठे आहे. हे सर्व टीमवर्क आहे. यातील कोणताही घटक कमजोर झाला तर त्याची झळ वृत्तपत्राला पोचते. नाशिक लोकमतमध्ये मला खारीचा वाटा उचलता आला हे मी माझे भाग्य मानतो. माझ्या जडणघडणीत मात्र लोकमतचा सिंहाचा वाटा आहे, हे मी कधीही विसरु शकत नाही.

मालेगाव कार्यालय सुरु केले तेव्हा मी आणि माझे सहकारी नाना महाजन आम्ही लोकमतचे कार्यालयीन प्रतिनिधी म्हणून टेबलवर्क केले. मी जेमतेम काही महिनेच काम केले. परंतु लिखाणाचे पूर्ण स्वातंत्र्य होते हे मुख्यत्व करुन नमूद करावेसे वाटते. विशेष करुन आठवड्याची वार्तापत्रे लिहिण्यात, स्पष्टपणे मते मांडता येत होती. त्यामुळे वाचकांशी अधिक नाळ जोडली गेली होती. त्या प्रतिमेचा काहीअंशी प्रतिभेचा आजही लाभ मिळतो आहे. समाजात मानाचे स्थान मिळाले. इतकेच नव्हे तर मी नांदगावचा थेट लोकनियुक्त नगराध्यक्षही झालो. यात लोकमतचे योगदान होते. कारण लोकमत मी असे समीकरण नांदगावमध्ये झालेले होते.

आज किरण अग्रवाल निवासी संपादक म्हणून अतिशय उत्तम जबाबदारी पार पाडत आहे. त्यांच्या मागेही चळवळीचा वैचारिक वारसा आहे. वाचकांशी त्यांची नाळ चांगली जुळली आहे. व्यवस्थापक बी. बी. चांडकसाहेब यांचे नियोजन चोख आहे. लोकमतचे संजय वाघ, संजय पाठक, सुधीर कुलकर्णी व इतर सर्व टीम उत्तम प्रकारे आप आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडत आहे. लोकमत बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन वाटचाल करीत आहे. लोकमतला रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !

दुसरे असे की, दिव्य मराठीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांचा आज वाढदिवस आहे. जयप्रकाशची शालेय कारकीर्द ही आमच्या नांदगावची आहे. जयप्रकाश यांचे वडील नांदगाव पोलीस स्टेशनला जमादार होते. एक रुबाबदार व्यक्तिमत्व होते. आमच्या लहानपणी पोलीस खात्याबद्दल एक अनामिक भीती होती. पवार जमादार यांचा ड्रेस इतर पोलिसांपेक्षा वेगळा होता. कमरेच्या पट्ट्या बरोबर एक आडवा लाल रंगाचा पट्टा त्यांना होता. जमादार हेच पोलीस उप निरीक्षक यांच्या नंतरचे पद. त्या पदाला शोभेसे त्यांचे कामकाज होते. पोलीस खात्याची इमेज त्यांनी त्यांच्या काळात जपली होती. नांदगावला त्यांना मानाचे स्थान होते. सर्व सामान्य माणसाला योग्य वागणूक त्यांच्यामुळे मिळत होती म्हणून ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले होते. जयप्रकाश यांचे बंधू भास्कर हे आमच्या गल्लीत रवी सोनवणे यांच्याकडे अभ्यासाला यायचे. त्यामुळे त्यांची माझी तोंड ओळख होती.

देशदूतमध्ये खऱ्या अर्थाने जयप्रकाश व आमची मैत्री झाली. ती आज तागायत कायम आहे. सुरेश अवधूत हे देशदूतचे संपादक असतांना त्यांनी जिल्ह्यात पत्रकारांची एक मोठी फळी निर्माण केली होती. देशदूत पत्रकार घडविण्याची कार्यशाळाच होती. शैलेंद्र तनपुरे (महाराष्ट्र टाइम्स), सुधीर कावळे (पुढारी), जयप्रकाश पवार (दिव्य मराठी) हे त्याच शाळेत तयार झालेले आजचे आघाडीचे निवासी संपादक आहे.  प्रत्येकाची लेखन शैली वेगळी आहे. हे माझे समकालीन पत्रकार मित्र आज आघाडीच्या वृत्तपत्रांची जबाबदारी सांभाळत आहे याचा मला निश्चित अभिमान आहे.कारण या प्रत्येकाचा सुरुवातीचा पत्रकारीतेतील संघर्ष मी पाहिला आहे.

जयप्रकाश पवार यांनी आज दिव्य मराठीत आपल्या लेखणीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. जयप्रकाश यांचेकडेही चळवळीचा मोठा वारसा आहे. तळागाळातल्या माणसाला केंद्रबिंदू मानून आपली लेखणी चालवीत आहे. विचारांची पक्की बैठक असल्याने त्यांना शक्य झाले आहे. त्यामुळे त्यांनाही फक्त वाचकच नव्हेतर जनमानसात आदराचे स्थान आहे. वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतांना जयप्रकाश यांना उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य लाभो, ह्या शुभकामना !

पत्रकारिता आज विश्वासार्हता टिकवून आहे का अशी शंका अनेकजण घेतात, त्याला करणे वेगवेगळी आहे. काहींच्या विरोधात लेखणीचा प्रहार झालेला असतो. काहींना अवाजवी प्रसिद्धी हवी असते. प्रत्यक्षाहून प्रतिमा मोठी करावी अशी अपेक्षा असते. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू अशीही आहे की पत्रकारितेला परस्परविरोधी शब्द दलाल म्हणून रुढ होतोय. चमचेगिरीचा शापही पत्रकारितेला काही ठिकाणी लागलेला आहे. पाकीट संस्कृतीला काहीजण चटावले  आहेत.  हे असे का घडते आहे याचा गांभीर्याने झाला पाहिजे. नाहीतर मंतरलेले पत्रकारितेचे दिवस एक स्वप्नरंजन ठरेल. पुन्हा एकदा लोकमत व जयप्रकाश पवार यांना शुभेच्छा !

- भास्कर कदम, नांदगाव (नाशिक)

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

भोंदूबाबा आणि संसार ...