कशी अवदसा आली ; माणूस माणसाला पारखा !
काल गोटूला (मनोज नेमाणे) फोन केला, त्याने सांगितले : भाऊ लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आजतागायत नांदगाव परिसरात २५-३० जणांचे नैसर्गिकरित्या वृद्धापकाळाने, जुनाट व्याधीने तर काहींचा हृदयविकाराने निधन झाले आहे. यात सर्व जातीधर्माचे होते. माणूस गेला की आपल्याकडे त्याला पोहचवायला गर्दी जमायची. आता तर घरचे जेमतेम १०-२० जणांच्या म्हणजे फक्त घरातील माणसात मूठमाती द्यावी लागत आहे. दारावर जाणेही अवघड झाले आहे. त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, हे दुःख पेलण्याची शक्ती त्यांना नियंता देवो, हीच प्रार्थना !
माझा पत्रकार मित्र सुधीर रांगोळे याचे सुमारे १५ वर्षापूर्वी हृदयविकाराने अकाली निधन झाले. आमच्यासह अनेकजण शोकसागरात बुडालो. त्याच्या अंत्यविधीप्रसंगी तत्कालीन सकाळचे संपादक उत्तमराव कांबळे यांनी प्रातिनिधिक श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी ते म्हणाले, व्यक्तीचे आयुष्याचे मोजमाप त्याला शेवटी पोचवायला किती डोकी येतात त्यावर ठरते. उपस्थित जनसमुदाय पाहिल्यावर सुधीर किती जगला यापेक्षा सन्मानाने जगला हे महत्वाचे आहे. आज हा प्रसंग आठवण्याचे कारण असे की, लॉकडाऊनपासूनआजतागायत नांदगाव शहरात या काळात इहलोक सोडून गेले. त्यांचे सर्व विधी चटावरच्या श्राद्धाप्रमाणे उरकावे लागले. या सर्वांचे समाजातील स्थान कोणत्या मोजपट्टीने मोजायचे. हे सर्व वेदनादायी आहे.
कोरोनाचा हा कोंडमारा भयानक आहे. माणूसच माणसाला पारखा झालाय. प्लेगच्या महामारीनंतर कोरोनाची महामारी आली आहे. अलीकडच्या शतकातील ही भयानक घटना आहे. त्याकाळात आधुनिकीकरण झाले नव्हते. वेगवेगळे शोध लागले नव्हते. आज हे सर्व असूनही संपूर्ण जग हवालदिल, अस्वस्थ झाले आहे. अणूबॉम्बची गुर्मी एका किटाणूने जिरविली आहे. जग एक वेगळ्याच विळख्यात गुरफटले गेले आहे. यावर अजूनही निश्चित असा उपाय सापडलेला नाही, जोपर्यंत उपाय सापडत नाही तोपर्यंत अमर्याद नुकसान अटळ आहे. पद-पैसा ह्या गोष्टी क्षणभंगुर आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा आज मृत्यूशय्येवर असह्य अवस्थेत खितपत पडला असल्याचे वृत्त आहे. जगाला अणुबॉम्बची धमकी देणाराही आज मृत्यूशी झगडत आहे. यापासून आपण सर्वसामान्य माणसं काही धडा घेणार आहोत काय? माटी के पुतले तू इतना गुमान न कर, हेच अंतिम सत्य आहे.
कोरोनामुळे आजवर जगभर लाखो मृत्यूमुखी पडले आहे. क्रिकेटचा स्कोर सांगावा तसे प्रसारमाध्यमे मिनिटा मिनिटाला अपडेट देत आहे. तसतशी माणसा माणसातील अस्वस्थता वाढत आहे. काही बातम्या तर काळीज पिळवटून टाकणाऱ्या आहेत. स्वतःचे मुलेबाळेच बापाच्याच अंत्यविधीला नाकारताहेत. ज्याने जन्म दिला त्याच्याबाबत ही भावना निर्माण व्हावी, अशा या कोरोनाला कोणता शाप दिला म्हणजे तो नाहीसा होईल.
सध्या लोकांनी घरातच बसावे यासाठी प्रकाश जावडेकर या मंत्री महोदयांनी दूरदर्शनवर रामायण-महाभारत ही मालिका सुरु केली आहे. त्यांची दूरदृष्टी वाखाणण्याजोगी आहे. आज समाजाला या  शिकवणूकीची गरज आहे. रामराज्य प्रजेसाठी, मानवतेसाठीच होते. रामाने रावणाच्या अहंकाराचे दहन केले. सत्य-असत्य, धर्म-अधर्म, राजनिष्ठा-पतिनिष्ठा असे अनेक जीवनमूल्य त्यात आहे. साधनेतून विद्या प्राप्त करणे. तपस्यातून, बाणातून, शापातून अनेक गोष्टी घडल्या. आज रामायण-महाभारतातून राज्यकर्ते तशीच जनता काही धडा घेताय का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. साध्वी उमा भारती यांनी शाप वाणी उच्चारली आहे. त्यांनी कोरोनाच्या किटाणूचा नायनाट व्हावा म्हणून आपली तपस्या सत्कारणी लावावी असे वाटते, यात कोणतेही राजकारण नाही. ज्याचा त्याचा धर्म ज्याने त्याने पाळावा, मानवता हाच खरा धर्म आहे, असे रामायण-महाभारत शिकविते. कोरोनाच्या महामारीचा नायनाट व्हावा, एवढ्याच प्रामाणिक इच्छेतून माफक अपेक्षा.
कोरोनाच्या जागतिक युद्धात केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. आधुनिक देवदूत डॉक्टर, नर्स, पोलीस, आरोग्यदूत, सफाई कामगार इत्यादी घटक आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा बजावीत आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वासमोर नतमस्तक होऊ या. जेथे मुले बापाला नाकारतात तेथे हे आधुनिक देवदूत सेवा बजावताय. ही जाणीव प्रत्येकाने ठेवलीच पाहिजे. स्वतःच्या कुटुंबाला ही मंडळी पारखी झाली आहे.
देशाच्या हिताचा विचारकरुन मंत्री महोदय नितीन गडकरी म्हणताहेत आजच्या कठीण काळात राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने कोरोना विरुद्धची लढाई लढू या, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाच पाहिजे. या काळात निरपराध तपस्वी साधूंची जमावाने हत्या केली ही घटना देशाला काळिमा फासणारी आहे, याचे समर्थन होऊच शकत नाही. निषेध हा शब्द खूपच तोकडा आहे. मृत्यू अटळ आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. तो अमानवी नसावा, नैसर्गिक आणि सन्मानाचा असावा.
कोरोना कधी संपेल ते आज सांगता येत नाही, अशाकाळात माणसातील माणसातील माणुसकी संपता काम नये. आज लॉकडाऊन हा काहीसा उपाय असेल तर तो पाळलाच पाहिजे. कारण कोरोनाने मरण हे सन्मानाचे नाहीय, असे मरण तर दुष्मनालाही येऊ नये, असे विदारक वास्तव आहे. आपण का विस्तवाची परीक्षा बघावी. त्यासाठी घरातच थांबून आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊ या, कोरोनाच्या मराईचा, अवदसेचा गाडा गावाबाहेर नेऊ या. माणसाला माणसापासून पारखे होणेपासून वाचू या.आपले आप्तस्वकीय या दुर्दैवी कालखंडात आपल्याला सोडून नैसर्गिक अथवा महामारीने इहलोकात गेले त्यांना दुरुनच मोबाईलवर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करु या !
एक काळीज पिळवटून टाकणारा फोटो आपल्या माहिती आणि योग्य तो बोध घेण्यासाठी देत आहे, त्यात मुलांनी आपल्या कोरोनाबाधीत बापाचा अंत्यविधी करण्याचे नाकारले, त्यावेळी शासकीय अधिकारी यांनीच त्याचा दहनविधी पार पाडला. मरावे परी कीर्तीरुपी उरावे, असे म्हटले गेले आहे. ही कीर्ती नाही तर अपकीर्ती आहे, या चुकीला माफी असूच शकत नाही.
- भास्कर कदम, नांदगाव.

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

भोंदूबाबा आणि संसार ...