रमेश सोर : हाडाचा-विचाराचा मजबूत सैनिक !
रमेश किसन सोर हा माझा मित्र. केवळ माझा मित्र म्हणून त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या विषय चांगले लिहावे, बोलावे असे नाही. अनेक बाबतीत त्याचे वेगळेपण आहे. त्याने जे अनुभवले, भोगले त्याची मोठी कहाणी आहे. त्याला चळवळीची, जगण्याच्या धडपडीची किनार आहे. रमेश म्हणजे खरे तर नियतीकडून परत मिळालेले रिटर्न गिफ्ट आहे. म्हणून त्याच्या आज असण्याचे मोल मोठे आहे. येणारा प्रत्येक दिवस त्याच्यासाठी, कुटुंबासाठी, आमच्यासाठी वाढदिवसच आहे. रोज एकेक दिवसाने तो वाढतो आहे. याचेच खरे समाधान आहे.
एका सायंकाळी रमेश व मी नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसलो होतो. रमेश खुर्चीवरून अचानक कोसळला. माझ्याजवळच डॉ. सुरेश गायकवाड हा बसलेला होता. त्याने क्षणाचा विलंब न लावता त्याला माऊथ ब्रेथींग दिले. तोपर्यंत रमेश गेल्याची चर्चा चौकात वाऱ्यासारखी पसरली होती. रमेश रिव्हर्स झाला. गोल्डन सेकंदात तो पुन्हा शुद्धीवर आला. हे माझ्यासमोर घडले. मी पुरता हादरुन गेलो होतो. त्याचे हातून समाजाची सेवा घडायची होती. आज तो पुन्हा ठणठणीत आहे. जगण्याबरोबर विचारांची लढाई लढत आहे.
रमेश खरेतर माझा मित्र परंतु माझ्या मोठ्या भावाने ही मैत्री अलगत पळविली. रमेश माझ्यापेक्षा माझा मोठा भाऊ रमेश कदम (संपादक समर्पित) यांच्या अधिक जवळचा झाला. रमेशने माझ्या भावाला माझी गरजच भासू दिली नाही. माझा भाऊ माझ्याऐवजी रमेशलाच अधिक कामे सांगायचा. रमेश आज्ञाधारक सेवकाप्रमाणे ते पूर्ण करायचा. रमेश आमच्याशी एकजीव झाला; अर्थात माझ्यापेक्षा भावाने त्यालाच जास्त जीव लावला. रमेशचा मूळ स्वभाव मेहनती. काबाडकष्ट हे जसे त्याच्या पाचवीलाच पुजलेले होते. त्याची त्याने कधीच पर्वा केली नाही आणि विचारांशी तडजोडही केली नाही.
रमेशचे वडील रेल्वेत नोकरीला होते. रमेशची परिस्थिती बेताचीच. चार भावात तो तिसरा. त्याचे दोघे भाऊही रेल्वेत. परंतु रमेशचा मूळ स्वभाव हा कोणावर अवलंबून राहणारा नव्हता. धडपडीवृत्ती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षण करीत असतानाच त्याने पेपर विकले, नंतर तोही रेल्वेत लागला.
रमेशमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता दडलेला होता. तो किडा त्याचा कायम वळवळत असायचा. आमचा प्रेस म्हणजे राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचे बैठकीचे केंद्रच होते. रमेशला त्यांच्यात वावरायला आवडायचे. रमेशची जडणघडण राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारातून झालेली. त्याची आमची नाळ जोडण्याचे ही विचारधारा प्रमूख होती. कधी कधी समाजातील बदमाशी पाहून तो खूप संतापायचा. नंतर त्याच्या लक्षात यायचे हे आपले चार भिंतीतील रुदन आहे. तो शांत व्हायचा. समर्पित या आमच्या सप्ताहिकामुळे रमेश हा युवक बिरादरी मुंबई या चळवळीशी जोडला गेला. समर्पित एक दशक युवक बिरादरीचे मुखपत्र होते. समर्पित आणि युवक बिरादरीचे संस्थापक क्रांती शहा यांच्यामधील रमेश एक दुवा होता. युवक बिरादरीचे सायकल यात्रेत तो नांदगावचा प्रतिनिधी म्हणून सामील झाला होता. या काळात त्याने महाराष्ट्रभर मित्र परिवार जमविला. माणसे विचारांनी जोडणे हा रमेशचा जणू छंदच झाला. आज त्याच्या मित्र परिवारात थोरामोठ्यांचा समावेश आहे. रमेश म्हणजे एक व्यक्ती न राहता चळवळ बनला आहे.अनेक सामाजिक संस्थेत तो आजही कार्यरत आहे.  खरंतर तर तो विचारांनी मजबूत असलेला हाडाचा कार्यकर्ता आहे. राष्ट्र सेवा दलाच्या भाषेत तो सदैव सैनिक आहे. त्याची मूस आणि मूठ मजबूत आहे.
रमेश सोर याने केव्हांच वयाची साठी पार केली आहे. त्याचा परिवार सुखी आहे. माधवी वहिनी, मुले तुषार व जय आणि सून नातू यात रमेश आताशा काहीसा रमलाय. त्याचबरोबर चळवळीची वळवळ चालूच आहे. त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत तो त्याच्या चळवळीच्या ध्येयापासून दूर जाणार नाही याची सर्वांना खात्री आहे. विचार जगण्याचं सामर्थ्य आहे, हेच त्याच्या आजच्या अस्तित्वाचे सूत्र आहे. रमेशला आमच्या तमाम मित्र परिवाराच्यावतीने वाढदिसनिमित्त शुभेच्छा देतांना त्याला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो ह्याच सदिच्छा !
- भास्कर कदम, नांदगाव

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

भोंदूबाबा आणि संसार ...