कोरोना : गरीबच रस्त्यावर तडफडून मरतोय !
भूत, वर्तमान, भविष्य या काळात मन भटकत असते. त्यात चांगली, वाईट, बरी अशी स्थिती असते. म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती. माणसाला वाचा आणि भावना ही खास देणगी नियंत्याकडून मिळाली आहे. त्या व्यक्त करण्यासाठी शब्द दिले. त्यात दुःख, राग, लोभ, आनंद हे गुणदोष सामील झाले. माणसाला स्मृती हा जसा गुण मिळाला; तसेच विस्मृती ही सुद्धा मोठी देण आहे. चांगले आठवणे हे मनाला रिझवते; तर वाईट विसरणे हे सुद्धा मनाला शांत ठेवते. जगणे मरणे हे एक श्वासाचे अंतर आहे. रिकामे मन हे सैतानाचे घर आहे, असे म्हटले गेले आहे. कोरोनाच्या या काळात मन सैरभैर झालेय. आणि सैतान आ वासून रस्त्यात उभा आहे. गरीब रोज रस्त्यावर तडफडून मरतोय. माणुसकीची परीक्षा होतेय. माणसं गोंधळली आहे. परंतु त्याहून अधिक शासक गोंधळले आहे. कुणी हेकेखोर आहे तर कुणी दुबळे. निसर्गाने-किटाणूने मारले, राजाने झोडले (पार्श्वभागावर दंडुक्याचा प्रहार) सांगायचे कुणाला. मुकी बिचारी कुणीही हाका, अशी अवस्था झालीय.
माझं मन असल्या विचारात सध्या भटकत आहे. आला दिवस पुढे ढकलत आहे. याकाळात अवस्था द्विधा झालीय. रोज टीव्ही, फेसबुक, व्हाट्सअप, इ पेपर वाचन सुरु आहे. अजूनतरी आशादायक असे चित्र दिसत नाहीय. काही दृश्य अक्षरशः मन विचलित करतात. रस्त्यात मुडदे पडताहेत. लेकरं बाळं घेऊन मजल दरमजल करीत ते मिळेल त्या वाटेने जात आहे. मिळेल ते खात आहे. सरकार यातून पळवाटा शोधत आहे. रोम जळत असतांना निरो फिडेल वाजवत होता. आज आपणास थाळ्या, टाळ्या वाजवायला सांगत आहे. शासन यंत्रणेत कमालीची विसंगती आहे. केंद्र व राज्यात समन्वय नाहीय. रोज नवनवीन आदेश पारित केल्या जात आहे. त्यात कागदी मेळ हाती ×××अशी अवस्था आहे. केंद्र सांगते एक राज्य ऐकते दुसरे आणि खाली अंमलबजावणी होते तिसरीच. ह्याची झळ सर्वसामान्य जनतेस बसत आहे. श्रीमंत त्यांच्या पोलादी बंगल्याच्या भिंती आड सुरक्षित आहे, असे चित्र आज तरी दिसत आहे.
कोणतेही सरकार थेट जनतेपर्यंत पोचत नाही. त्यांची प्रशासन यंत्रणा म्हणजेच सरकार असते. यालाच गरीब मायबाप सरकार म्हणते. सरकारचे यश अपयश या यंत्रणेवर अवलंबून असते. डॉक्टर, नर्स आणि पोलीस यांचे काम त्यांना मिळणाऱ्या साधनानुसार खूपच चांगले आहे. खरेतर ते या महामारीच्या काळात मैदानावर कोरोनाच्या विरुद्ध लढाई करीत आहे. आता प्रश्न उरतो तो सचिवापासून ते तहसीलदार या यंत्रणेचा. बहुतांशी ठिकाणी ऊंटाहून शेळ्या हकल्या जात आहे. बऱ्याच ठिकाणी स्वतःला सुरक्षित ठेवले आहे, हे दुर्भाग्य पूर्ण चित्र दिसून येत आहे. बहुतांशी ते बसल्या जागेवरून आदेशाचे कागदी घोडे नाचवत आहे. तेच त्यांचे प्रामाणिक काम. त्यांनी यासाठी सोपा मार्ग पत्करला आहे.
गाव बंद. अलिकडे त्याला लॉकडाऊन हा शुगर (ब्राऊन नव्हे) कोटिंग शब्द रुढ झाला आहे. पूर्वी आंदोलनात निषेधाचा एक मार्ग म्हणून बंद पुकारला जायचा. तसेच राष्ट्रीय नेत्याचे निधन झाले तर जनता स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवायचे त्याला हरताळ हा शब्द प्रचलित होता. आता हा लॉकडाऊन हा उपचार राहिला नाहीय. कोरोनाच्या सोबत जगावे लागेल असे संशोधक सांगत आहे. क्षय, मलेरिया, कॅन्सर, एड्स याप्रमाणे तो कायम घर करणार आहे. लस निर्माण होईपर्यंत उपाय नाही. प्रत्येकाने आपापली काळजी घेणे हा त्यावर उपाय आहे. तसे प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहेच. हे सुद्मास सांगणे न लगे. जो धोका पत्करेल तो मरेल. परंतु , यात तो दुसऱ्याला घेऊन मरेल हा खरा धोका आहे.
काहींना आपत्ती हीच संधी वाटते. गर्दीच्या नावाने जनतेला दोष द्यायचा. आपली जबाबदारी कमी करायची. गाव जास्त वेळ बंद ठेवायचे. ह्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी हात धुवून घेतले, असेही चित्र दिसून आले. हात भट्टीला ऊत आला. किराणा अव्वाच्यासव्वा भावाने विकल्या गेला. दोन नंबरची दारु भरमसाठ भावाने विकली गेली. गाय छाप तंबाखू ६०-७० रुपयांना विकल्या गेली. यासाठी अनेक तोड्यापाण्या झाल्या. दारुड्याला दारु मिळाली नाही असे सर्रास घडले नाही, तंबाखूवाल्याने आपली तलफ सोडली असेही झाले नाही. यात नफेखोरांनी आपले उखळ पांढरे करुन घेतले. यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन लोकडाऊनचा वेळ ठरविण्यात आला असेही घडले.  जितका लॉकडाऊनची वेळ जास्त तेव्हढी नफेखोरी जास्त असे प्रकार घडले. यात व्यापारी अधिकारी मिलीभगत आढळून आली, याची फक्त दबक्या आवाजात चर्चा आहे. दुबळे याशिवाय दुसरे काय करु शकतात.
नांदगावचे उदाहरण लक्षात घेतले तर राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे येथे सरळसरळ उल्लंघन केले गेले. त्यासाठी मालेगावचा भोकाडी उभा केला गेला. कोरोनाची विशिष्ट लक्षणे आहे. तो प्रत्यक्ष हातमिळवणी शिवाय होत नाही. यात हात आणि नाक सांभाळणे महत्वाचे आहे. दीड महिना उलटून गेला नांदगाव शहरात कोरोनाचा रुग्ण नाही. आता याचा अर्थ असा की जो येईल तो बाहेर गावावरून म्हणजे ट्रॅव्हल हिस्ट्रीने येईल. त्यासाठी नांदगाव शहरात प्रवेश करणाऱ्या सीमा सील केल्या पाहिजे. येथे तर अधिकारी व कर्मचारीच जास्त प्रमाणात ये जा करतात असे म्हणतात. म्हणजे सर्वसामान्य माणसाला कायद्याचा बडगा, आणि हे कायद्याचे बाप. न्याय नियम सर्वांना सारखे असतात, तुम्हाला मुभा आणि सर्वसामान्य लोकडाऊन हे कसे खपवून घ्यायचे. लॉकडाऊन समाप्तीनंतर या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. सरकार आज अडचणीत आहे. त्याला अधिक अडचणीत आणू नये. आज मरतोय गरीब त्याच्या मढ्यावरच्या टाळू वरचे लोणी कोणी खाऊ नये. सगळे येथेच भोगावे लागेल याची जाण ठेवा, हीच सरकारच्या, उपेक्षित जनतेचा हाच दबलेला आवाज आहे. हीच सरकार व सर्व सामान्य जनतेच्या भल्यासाठी माफक अपेक्षा.
- भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष, नांदगाव.

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

भोंदूबाबा आणि संसार ...