संतोषअण्णा एक मर्द कार्यकर्ता !
संतोष मधुकर गुप्ता : नांदगाव शहरात गुप्ता कंपनीची इन मीन साडे  तीन घरे. त्या घराला घरपण मिळवून देणे, ते इतर समाजात रुजविणे आणि त्याला समाज मान्यता मिळविणे हे तसे खूप अवघड काम. आपल्या कार्यकर्तृत्वाने हे स्थान गुप्ता कंपनीने मिळविले आहे. गुप्ता वाड्याला इतिहास आहे. परंतु, शंकरलाला ही मंडळी ह्या वाड्या बाहेरची. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात शंकरलाला यांचे किराणा दुकान आणि याच पंगतीत माझ्या वडिलांचे दुकान होते. वडिलांनी एक आणा हातात टेकविला की, मी लालाच्या दुकानातून गोळ्या बिस्कीट घेत असे. नारायण, मधुकर, सुधाकर, सुभाष ही भावंडे ह्या दुकानात बसत. नंतर नारायण शेठ यांनी रेल्वे विभागात वेगळे दुकान टाकले. या जुन्या दुकानावर मधुकर शेठच बसू लागले. सुधाकर बाजारहाट करायचे. सुभाष काकाने स्टेशनरी दुकान टाकले. अशाप्रकारे गुप्ता कंपनीचा विस्तार वाढत गेला. मूळ झाडाच्या अनेक फांद्या झाल्या. गुप्ता कंपनीचे वैशिष्ट्ये असे की त्यांनी व्यवसायाबरोबर समाजकारणात मूळ रुजविले. नांदगाव शहर हे समाजवाद्यांचा बालेकिल्ला. त्यामुळे शहरात समाजवादी विचारवंतानी हजेरी लावली. त्यातून अनेक कार्यकर्ते घडले. त्यात गुप्ता कंपनीचाही समावेश होता. विचारधारेची ही मूस त्यांच्या पुढच्या पिढीतही रुजली. त्यातच आजचा नांदगाव शहराचाच नव्हेतर तालुक्यातील आघाडीचा कार्यकर्ता संतोषअण्णा गुप्ता घडला. आज संतोष अण्णाचा वाढदिवस. त्याला त्याच्या कुटुंबातील एक घटक म्हणून नाहीतर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर शुभेच्छा! चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान जाहिरच झाला पाहिजे, असे माझे मत आहे. यातून एकानेही या वाटेवर वाटचाल केली तर चळवळीतील कार्यकर्त्याच्या आयुष्याचे फलित ठरेल.
संतोष अण्णा याने आमच्या अनेक आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. घोषणा द्याव्या तर संतोष अण्णा यानेच. आंदोलनातील संतोष अण्णा वेगळाच असतो. त्याच्या नसा नसात आवेश भरलेला असतो. अशाच एका आंदोलनाची गोष्ट आहे, आम्ही कांद्याचे दर व शहरातील दोन नंबरच्या धंद्या विरोधात आंदोलन केले. तत्कालिन पोलीस अधिकारी माळी यांना वाटले की, हे आपल्या विरोधात आंदोलन आहे. एक दिवस अगोदर संतोषअण्णा यांना बोलावून माळी यांनी सहभाग नोंदवू नका असे सांगितले म्हणण्यापेक्षा बजावले. तरीही संतोष अण्णा सहभागी नव्हेतर अग्रभागी राहिला. या आंदोलनात आम्हाला अटक झाली. या केसमध्ये माळी यांनी नंबरकारी संतोष अण्णा यांस केले. कोर्टात पुकारा व्हायचा संतोष गुप्ता वगैरे १७. अनेक दिवस केस चालली. नंतर राजकीय आंदोलन म्हणून ती केस विड्रॉवल झाली. सांगण्याचे तात्पर्य असे की, संतोष अण्णा साहेबांशी हात मिळवणी करु शकत होता. परंतु, संतोषने तसे केले नाही.
आजच्या बेगडी तसेच कामचलाऊ कार्यकर्त्यांनी फक्त निवेदन देऊन अधिकाऱ्यांसोबतच्या फोटोत तोंड घालून चमकोगिरी, चाटुगिरी करणाऱ्यांनी संतोषअण्णाची आंदोलनातील मैदानातील मर्दांगी लक्षात घ्यावी. आजच्या करोनाच्या जीवघेण्या लढाईत काही फोटो पाहिले की त्यांची कीव करावी की किळस असा प्रश्न आहे. दो आलू अनेक दयालू, अशी स्थिती आहे. यात काही सन्माननीय अपवाद आहे, ह्या हाताचे दान त्या हाताला कळू देत नाहीत.
आजही नांदगावमध्ये कोरोना संदर्भात काही अधिकारी मंडळी स्वतःची कातडी बचावण्यासाठी नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे. या बाबतही संतोष अण्णातील कार्यकर्ता आवाज उठवू पाहतो तर त्याची योग्य ती पाठराखण होत नाही, ही खंत संतोषअण्णा याने बोलून दाखविली आहे. कधी कधी असा प्रश्न पडतो तो असा की, लोकप्रतिनिधी जनतेच्या हितासाठी निवडून जातात की अधिकाऱ्यांची पाठराखण करण्यासाठी. याचे कारण असे की नागरिकांच्या गर्दीवर बोंब मारण्यापेक्षा नियोजनात काही चूक आहे का याचाही शोध घेतला गेला पाहिजे. आज लॉकडाऊन जाहीर होऊन दीड महिना उलटून गेला आहे. नांदगाव शहरात एकही रुग्ण नाही. म्हणजे कोरोना बाहेरच्या प्रवाशी व्यक्तीकडून येईल. यासाठी शहरात येणाऱ्या सीमा चोख ठेवल्या पाहिजे. त्याऐवजी अधिक काळ शहरातील लोकांना डांबून ठेवायचे स्वतः निर्धास्थ राहायचे असा हा कातडीबचाव प्रकार आहे. यावर संतोषअण्णा सारख्यांचा आक्षेप आहे. परंतु, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
बरे जाऊ द्या, संतोषअण्णा आजही आपल्या टपरीवर गोळ्या बिस्कीट विकत आहे. ते त्याच्या जगण्याचे साधन आहे. त्यात तो समाधानी आहे. लबडीपेक्षा प्रामाणिक धंदा बरा, असे त्याचे स्पष्ट व स्वाभिमानी धोरण आहे. राजकारणी वापरुन गरज संपली की दुर्लक्ष करतात हा अनुभव संतोष अण्णाच्याही वाट्याला आला आहे. आता तो खेद आणि खंत या पलिकडे गेला आहे. संतोष अण्णाने चळवळीत व सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. त्याच्या या कामाचे फळ म्हणून प्रामाणिक नागरिकांनी संतोष अण्णाच्या अंगावर नगरपालिकेत निवडून देऊन गुलाल टाकला आहे, ही त्यातल्या त्यात काहीशा समाधानाची बाब. संतोष अण्णाने आजवर तब्बेतीकडे कानाडोळा केला. अनेक व्याधी जडून घेतल्या आहे. संतोषने आता संताप कमी करावा, तब्बेतीलाही जपावे, हा जेष्ठ मित्र या नात्याने सल्ला. संतोष अण्णास उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो, याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !
- भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष, नांदगाव.

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

भोंदूबाबा आणि संसार ...