युनूस रफिक शेख (वकील) :
पदरमोड करणारा प्रामाणिक वकील !
नांदगाव शहराची पूर्वीची रचना जातीनिहाय होती, हे आज अनेकांना थोडं वेगळं तसेच काहींना आश्चर्य वाटेल; परंतु हे वास्तव आहे याच्या काही खुणा आजही अस्तित्वात आहेत. सोनार गल्ली, कासार गल्ली, तेली गल्ली, कुंभारवाडा, जंगम गल्ली, न्हावीवाडा, चांभारवाडा, मांगवाडा, महारवाडा, होलारवाडा, धनगरांची गढी, मराठ्यांची पाटीलगल्ली, मुसलमानांचा पन्नूवाडा, मारवाडी गल्ली, ब्राम्हण गल्ली अशा गल्ल्या व बोळा अस्तित्वात होत्या. त्याचप्रमाणे काशी पाटलाचा वाडा, बाईजाबाईचा वाडा, थत्ते वाडा असे वाडेही होते. यापैकी अनेक गल्ली बोळाचे आता नामकरण झाले आहे. जातीवाचक उल्लेख कमी झाले आहेत. जसे चांभारवाड्याचे श्रीकृष्ण नगर, मांगवाड्याचे गांधीनगर, महारवाड्याचे बौद्धनगर असा बदल झाला. वेशी बाहेर आता गावाचा विस्तारही झाला आहे. काही गल्ल्यांची नावे आजही जातीयवाचकच आहे. हा झाला गल्ली बोलाचा थोडक्यात परिचय. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की, या गावात सर्वच जातीजमाती गुण्यागोविंदाने जवळपास एकत्रच रहात, नांदत होत्या.
नांदगांवचे संस्थापक काशी पाटील (धनगर) यांना मानले जाते. ते अतिशय पराक्रमी होते. नांदगाव शहराला चोरचिलट्यांचा त्रास होता. त्या त्रासापासून काशी पाटलांनी सुटका करुन दिली होती. त्यांना त्या काळात सात खून माफ होते, अशीही आख्यायिका सांगितली जाते. नांदगावला बंदिस्त कोट होते. दोन वेस आहेत. बुरुजही होते. रात्री गाव बंद केले जात होते. हा इतिहास मुद्दाम विस्ताराने सांगत आहे. कारण या गावाला जातीभेदाचा वाराही शिवला नव्हता. कुणाचा कुणाला विटाळ व द्वेष नव्हता. कदाचित मनात असेल तरी जाहीर कधी कोणी व्यक्त केला नाही.
युनूस शेख वकिलाची गल्ली आणि आमची गल्ली जवळपास एकच. सवर्ण-दलित-मुस्लीम असा भेद नसल्याने आमचे पूर्वज व त्यांचे पूर्वज एकाच ठिकाणी व्यापार-उदीम करायचे. आम्हीही एकत्रच खेळलो, बागडलो, वाढलो, शिकलो. आमच्या बापजाद्यांचा संबंध शेख वकिलांच्या बापजाद्यांशी होता. आमच्या नव्या पिढीच्या संबंध नव्या पिढीशी तसाच राहिला. वकिलाचा पन्नूवाडा हा व्यापारी वर्तुळात गणल्या जात असे. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. सर्व समाज घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्याच नात्याने, नियतीने आम्ही त्यांच्याशी व ते आमच्याशी वागत आले. आज हे कथन करण्याचे निमित्त युनूस शेख वकील यांचा २ जून हा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देतांना व्यक्ती बरोबर गावगाड्याचा उजाळा व्हावा हा हेतू आहे. गाव, जातीपातीची रचना कळल्याशिवाय माणूसही कळत नाही.
युनूस वकील यांचा जन्म एका मुस्लीम व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचे माझे माझे महाविद्यालयीन शिक्षण एकाच कॉलेजमध्ये झाले. ते वाणिज्य पदवीधर झाले. नंतर त्यांनी लॉ नाशिकला केले. त्यानंतर नांदगाव कोर्टात वकिली सुरु केली. व्यवसायातील सचोटीने, अभ्यासूवृत्तीने त्यांनी अल्पावधीत नाव कमावले. तसेच व्यक्तिगत मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात जमवला. प्रामाणिकपणा, लोकप्रियता, मित्रपरिवार या जोरावर ते नगरसेवक बनले. पालिकेतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. माजी आमदार अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बरीच मित्रमंडळी राजकारणात सक्रिय झालो. माझ्यासह शिवाजीराव पाटील, शिवाजी कवडे, प्रदीप कासलीवाल, प्रफुल्ल पारख अशी खूप सारी मित्रमंडळीस युनूस वकिलांच्या कायदेशीर व प्रशासकीय ज्ञानाचा आम्हाला नेहमी उपयोग होत असायचा. आजही तो अव्याहतपणे सुरु आहे.
युनूस शेख वकिलाची एक खास बाब येथे प्रामुख्याने नमूद करतो, आम्ही एक कांदा व दोन नंबर धंद्या विरोधात आंदोलन केले. आम्हाला अटक झाली. अर्थातच आमचे वकील शेख वकील. जामिनापासून सर्व खर्च त्यांनीच केला. केस १७ वर्ष चालली. न्यायालयाने तारखेला हजर नसल्याने अनेकदा शंभर रुपये प्रत्येकी दंड ठोठावला. तेही शेख वकिलच भरत असे. हे आमचे प्रातिनिधिक उदाहरण झाले. असे शेकडो उदाहरणे आहेत. सामाजिकभान जपून त्यासाठी पदरमोड करणे हा त्यांचा जणु स्वभावच आहे. सर्व जातीधर्माचा मोठा मित्र परिवार आज त्यांनी जमविला म्हणण्यापेक्षा कमविला आहे. प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जाणे, त्यांचा मूळ स्वभाव आहे. अशा दिलदार मित्राचा वाढदिवसानिमित्त आम्हाला आनंद होणे स्वाभाविक आहे. कोरोनाने अनेक संकटे निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी अभिष्टचिंतनासाठी हा शब्दफुलोरा मांडला आहे. त्यांना दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो, याच मनःपूर्वक सदिच्छा !
- भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष, नांदगाव.

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

भोंदूबाबा आणि संसार ...