शंकर विसपुते : नाना कळा(कला) असलेला पारदर्शी छायाचित्रकार !
शंकरचे प्रचलित टोपण नाव नाना. त्याची खरी ओळख नाना हीच आहे. नाना कोणत्याही कामाला ना म्हटला नाही, आणि लाजलाही नाही. त्याने बीनलाज्या काम कधी केले नाही. नानाची जडणघडण माझ्या डोळ्यादेखतची आहे. परिस्थितीशी संघर्ष करीत त्याची सुरवात झाली, तो आजही झगडतोच आहे. त्याचे दुःख कधी त्याच्या चेहऱ्यावर दिसले नाही. परिस्थितीशी सतत त्याला दोन हात करावे लागत आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर त्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली. नाना कण्हतकुथत बसला नाही.
लोकडाऊनच्या काळात लग्नसराई थांबल्यात जमा झाली. फोटोग्राफीच्या धंद्याला अवकळा आली. घरखर्च थांबला नाही. कमावणारा फक्त नाना एकटाच. त्याने कोणाकडे हात न पसरता आपल्या मोटरसायकलला कॅमेराऐवजी दोन कॅरेट जोडले. त्यात भाजीपाला, टरबूज-खरबूज भरुन तो धंद्याची कोणतीही लाज न बाळगता गल्लीबोळात, खेडोपाडी विकू लागला. तसा तो प्रेस फोटोग्राफर. त्याचीच ही कथा त्याच्या फोटोसह पेपरात छापून आली. माझे मन काहीसे हेलावले, परंतु नानाचा मला रास्त-सार्थ अभिमानही वाटला.
नानाने कष्टाला कधी नाकारले नाही. जगण्याची त्याची धडपड त्यालाच रोजच नवीन काही शिकवत आहे. नानाचे शालेय शिक्षण जेमतेम. इंग्रजीचा गंधही नाही. एबीसिडीही येत नाही, परंतु नाना संगणकावर फोटोशॉप, व्हिडीओ एडिटिंग करतो. त्याची कलात्मक दृष्टी अफलातून आहे. नानाला पाहताक्षणी मराठी सिनेमातील दामू अण्णा मालवणकर आठवतो. नानाला जन्मजात काहीसे तिरळेपण लाभले आहे. नाना फोटोमात्र राईट अँगलने काढतो. त्याचा तो सेन्स जबरदस्त आहे. त्याने टिपलेले अनेक फोटो पेपरमध्ये गाजले आहे. प्रेस फोटोग्राफर म्हणून नाना नावाजलेला आहे. प्रसंगानुरूप छायाचित्रण करणे ही नानाची खासियत आहे.
आज मात्र नाना आर्थिक अडचणीत आहे. पेपरमधील फोटोने नानाला नाव मिळाले पण त्याने पोटाची खळगी भरत नाही हे जळजळीत वास्तव आहे. प्रिंट मीडियाच अडचणीत आलाय, त्यालाच कोरोनामुळे लकवा झालाय. अनेक संपादक, वार्ताहर यांना घरी बसावे लागले आहे. तेथे नानाची काय कथा. नाना बिचारा न लाजता भाजीपाला तरी विकत आहे. म्हणून नानाच्या जगण्याला, कष्टाला सलाम केला पाहिजे. नाना आमच्यावर जीवापाड प्रेम करतो. त्यात त्याचा कंजूषपणा नसतो. त्याच्या फाटक्या झोळीत अपार माया साठविली आहे. त्याचे मन नितळ व पारदर्शी आहे. तेच त्याचे खरे धन आहे. आज आमच्या लाडक्या नानाचा वाढदिवस आहे. त्याला कोरड्या शुभेच्छा देतांना मन भरुन आले आहे. नाना, तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
- भास्कर कदम, नांदगाव.

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

भोंदूबाबा आणि संसार ...