शशिकांत नागरे : साखळीतील एक कडी निखळली !
अंधारीचा शशिकांत अंधाराच्या दिशेने कायमचा निघून गेला. आमच्या मित्रत्वाच्या साखळीतील एक कडी आज दि. २८ जून२०२० रोजी निखळली. बरोबरीचा मित्र जेव्हा हे जग सोडून जातोना तेव्हा ते दुःख वेदनेपलिकडचे असते. ते शब्दाच्या कवेत मावत नाही. नियती किती निष्ठूर असते, दुःखाच्या वेदनेवर शेवटी शब्दांचीच फुंकर मारावी लागते. दुःखाचा आकार कसा मोजावा, डोंगराएव्हढा की आभाळाएव्हढा. माणूस गेल्यानंतर - मेल्यानंतर, दुःखाचा डोंगर कोसळला, असे आपण म्हणतो.
खरे तर माणसाने हा इहलोक सोडल्यानंतर त्याचे ठेवलेले नाव तेथेच थांबते. बॉडीला बाहेर काढा, बॉडी कुठेय, आली का, असे शब्दप्रयोग सुरु होतात. आज आमच्याही शशिकांत नागरे नावाच्या मित्राची नावाऐवजी बॉडी झाली. आता त्याला मूठमाती दिली जाईल. हे ऐकायला खूप जड जातेय. शेवटी वास्तव स्वीकारावेच लागते. एक दिवस एक-एक करुन सर्वांना या दिशेने जावे लागणार आहे, हे जरी खरे असले तरी मानवी मनाला भावना आहेत. आज आपला मित्र आपल्यात नाही असे समजताच डोळ्यातून अश्रू आपोआप ओघळू लागतात. अश्रू पुसून मित्रत्वाच्या नात्याने मी काही आठवणींच्या भावना व्यक्त करतो.
शशिकांत हा तालुकामास्तर वाल्मीक रेवजी नागरे (गुरुजी) यांचा जेष्ठ पुत्र. नागरेगुरुजी आमच्या गल्लीलगतच्या गल्लीत म्हणजे मोठ्या होळीवर एक खोली भाड्याने घेऊन रहात होते. ते मूळचे तालुका चाळीसगाव मधील अंधारी गावचे. नोकरीनिमित्त ते नांदगावला रहात होते. नागरेगुरुजी व्यक्तिमत्व अत्यंत उंच व भारदस्त होते. एक टांगी धोतर, डोक्यावर तीन इंची गोल काळी टोपी, उंचीमुळे त्यांचा पाहताक्षणी समोरच्यावर प्रभाव पडायचा. शिक्षणक्षेत्रात त्यांचा दरारा होता. खऱ्याअर्थाने मास्तरांचे तालुकामास्तर शोभायचे. त्यांचे कार्यही उल्लेखनीय होते. त्यांच्या अनुवंशिकतेने शशिकांतला अनेक गुण जन्मजात लाभले होते. तो खूप हुशार होता. उपजत नेतृत्वगुण होते.
नांदगावला तो महाविद्यालयात शिक्षणासाठी आला, आणि त्याने भराभर मित्र परिवार जोडला. गल्लीचाच मामला असल्याने आम्ही त्याच्याकडे खेचलो गेलो. मदन हिरे, युवराज पाटील हेही मस्तरांचीच मुले. ते पहिले मित्रकळपात सामील झाले, मग मी, इकबाल शेख, शहाबुद्दीन शेख, शिवाजी कवडे, शरद चव्हाण, रमेश सोर, उत्तम देवकर, सुरेंद्र पाटील, रमेश थोरात असे आम्ही मित्र एकत्र आलो. आमचा टीम लीडर शशिकांत नागरे होता. त्यावेळी महाविद्यालयात निवडणुका व्हायच्या. काही ग्रामीण भागातील मुले सोबत घेऊन आम्ही पॅनल बनवायचो. निवडणुकीत सगळेच डावपेच वापरले जायचे. तेथेच आम्हाला राजकारणाचे बाळकडू मिळाले.
खरेतर आमच्या जीवनाला आकारच महाविद्यालयात आला. खेळ, नाटक, वक्तृत्व, नेतृत्व ह्या सर्व कला तेथेच बहरल्या. यामध्ये आमचा रिंगमास्टर शशिकांत नागरेच होता. शशी बोले दल हले, अशी आमची कार्यपद्धती होती. परीक्षेच्या काळात मात्र आम्ही झपाटून अभ्यास करायचो. तेथेही आमच्यापैकी कोणी कमी नव्हते.
शशिकांत आणि त्याचे वडील नागरेगुरूजी हे दोघे बाप बेटेच रहात असल्याने स्वयंपाक शशिकांतलाच बनवावा लागे. शशी स्वयंपाक खूप चविष्ट बनवायचा. त्याच्या रुमवर गेल्यावर आम्ही पहिले त्याचे पातेले व टोपले झांबळायचो. अनेकदा त्याच्याकडेच जेवायचो. आमची मित्र कंपनी तशी खवय्यी. वरचेवर मटण-भाकरी पार्ट्या व्हायच्या. चुलीवरचे मटण व बाजरीच्या भाकरी बनविण्याचे प्रमुख काम शशीकडेच असायचे. ती चव आजही जीभेवर रेंगाळतेय. सांगायचे तात्पर्य एवढेच की शशी खूपच गुणी नव्हेतर बहुगुणी होता. आम्हा मित्रांचा तो नेता होता.
शशिकांत तसा एकदा मृत्यूचे चुंबन घेऊन परत आलेला. काही वर्षांपूर्वी तो खूप आजारी पडला. जगेन असा भरवसा नव्हता. नाशिकच्या दवाखान्यात त्याच्यावर उपचार झाले. तो बरा झाला. डिस्चार्ज घेतांना तो डॉक्टरला म्हणाला, तुम्ही मला नवा जन्म दिला, तुम्ही माझ्यासाठी देव आहात. त्यावेळी ते दोघेच होते. डॉक्टरच्याही डोळ्यात अश्रू तरळले. डॉक्टर त्याला जे म्हणाले ते मोठे विदारक होते. डॉक्टर शशीला म्हणाले, तुला तरी मी देव म्हणून भेटलो तुझे भाग्य चांगले. मी जिवंतपणी मरण यातना भोगतोय. माझी बायको मुले येथे कर्जाच्या खाईत लोटून मला सोडून परदेशात निघून गेले. मी जगतोय ते फक्त कर्ज फेडण्यासाठी. माझे म्हणून आता येथे कोणी नाही. शशीने जेव्हा हा किस्सा आम्हाला सांगितला तेव्हा अंगावर काटा उभा राहिला.
शशिकांत वडिलांप्रमाणेच शिक्षक म्हणून नोकरीला लागला. अनेक पिढ्या घडविल्या.तो जन्मजात शिक्षक होता. आम्हाला जीवनातील, जगण्यातील अनेक धडे त्याने शिकविले. तो मात्र डाव अर्ध्यावर सोडून निघून गेला. त्याच्या कुटुंबाबरोबरच आमचा मित्र परिवार पोरका झाला. आता शेष उरल्यात शशीच्या आठवणी. त्याची उजळणी म्हणजे वेदनेची उजळणी. आमच्या हृदयातील एक कोपरा त्याच्यासाठी कायम रिताच राहील. कितीही लिहले तरी त्याचा अध्याय संपणार नाही. कोरोनामुळे त्याच्या चितेवर शेवटच्या समिधाही टाकता येत नाही. लॉकडाऊन उठल्यावर दारावर जाऊन येऊ. आता अश्रू भरल्या नयनांनी दुरुनच भावपूर्ण श्रद्धांजली.
* भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष, नांदगाव.
.

Comments
Post a Comment