लोकशाहीर विठ्ठल उमप : जातिवंत कलावंत !

लोकशाहीर विठ्ठल उमप यांची यांची आज जयंती, त्यानिमित्त सर्वप्रथम विनम्र अभिवादन ! लोकशाहीर विठ्ठलदादा यांना पाहण्याचा, ऐकण्याचा, प्रत्यक्ष संवादाचा योग आलाय, हे मी माझे भाग्य समजतो. तसे रेडिओ, टीव्हीवर त्यांना हजारदा ऐकले, पाहिले. प्रत्यक्ष भेट फक्त एकदा-दोनदाच झाली. नाशिक येथील अखिल भारतीय शाहीर परिषदेच्या अधिवेशनात पहिल्यांदा त्यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यांनतर अलिकडे साधारणतः दहाएक वर्षांपूर्वी त्यांची माझी थेट भेट नांदगाव येथील माझ्या 'समर्पित'च्या कार्यालयातच झाली. अखिल भारतीय शाहीर परिषदेचे माझे मोठे बंधू रमेश कदम हे संस्थापक असल्याने महाराष्ट्रातील बहुतांशी शाहिरांशी कौटुंबिक संबंध आहेत. अनेक शाहीर नांदगाव येथे आमचेकडे येऊन गेले आहेत. त्यातील विठ्ठलदादा यांची भेट अविस्मरणीय होय. ती आजही तितकीच ताजी आहे.

विठ्ठलदादा नांदगावला शासकीय एड्सच्या विषयी जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्याची पूर्वकल्पना आम्हाला नव्हती. अचानक भेट आश्चर्य चकित करणारी होती. मी माझ्या कार्यालयात यथोचित सन्मान केला. यावेळी माझा मित्र परिवार उपस्थित होता. त्यानंतर विठ्ठलदादा यांनी कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले. नियोजन कसे करायचे असे विचारले. विठ्ठलदादा यांचे बोलण्याची, पहाण्याची लकब काहीशी आगळीवेगळी होती. आमचेकडे बहुतांशी कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होतात. तेथेच कार्यक्रम घेण्याचे ठरले. त्यावेळी नांदगावला लोडशेडिंग होते. विद्युत पुरवठा खंडित झालेला होता. लवकर येणार नव्हता. करायचे काय, असा प्रश्न उभा झाला. माझेकडे एक छोटेसे जनरेटर होते. त्याचा वापर करुन माईक व लाईटची व्यवस्था केली.

विठ्ठलदादा यांचा मूळ स्वभाव अडचणींवर मात करण्याचा होता. त्याही परिस्थितीत त्यांनी आपला पहाडी आवाज घुमवला. बघता बघता माहोल जमला. माहोल जमला तसा दादांचा स्वर टिपेला भिडला. एवढा मोठा शाहीर अचानक नांदगावच्या डॉ. आंबेडकर चौकात उभा राहून कार्यक्रम करतो याचेच अप्रूप श्रोत्यांना वाटत होते. दादांचा आवाज आपल्या कानात साठविण्यासाठी जे रेडिओ, टीव्हीला कान व डोळे लावून बसायचे त्या सर्वांना विठ्ठलदादा जवळून पहायला, ऐकायला मिळाले. जे या संधीपासून वंचित राहिले, त्यांना मात्र रुखरुख लागून राहिली.

काही माणसं जन्माला येतात तीच मुळे समाजाच्या उद्धारासाठी. काही समाज सेवेतून, काही कलेच्या माध्यमातून, काही आपल्या उपजत विशेष कौशल्यातून समाज मनावर गारुड करतात. त्यापैकी लोकशाहीर विठ्ठलदादा उमप एक होत. त्यांनी आपल्या परिस्थितीचे कधी भांडवल केले नाही. त्यावर सतत मातच केली. रडणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. गाणे हाच त्यांचा श्वास होता. गाता-गाताच ते आपले गाणे मागे ठेवून गेले. त्यांचे गाणेच आज अनेकांचे जीवन गाणे झाले. कलाकाराचे रंगमंचावरच जाणे हे कलेला आपले जीवन समर्पित करणे होय.

विठ्ठलदादा यांचा समर्थ वारसा नंदेश उमप व त्यांचे बंधू तितक्याच ताकदीने, उमेदीने, सामर्थ्याने चालवीत आहे. त्यालाही मोठी समाज मान्यता मिळत आहे. नंदेशचे गाणे आणि त्यानुरुप अभिनय असणे ही वैशिष्ट्ये विठ्ठलदादा यांच्या अस्तित्वाचा आभास निर्माण करते. परंतु विठ्ठलदादा विठ्ठलदादाच होते, हे नंदेश उमप यांनाही मान्य असेल. जीवंत व जातिवंत कलावंत जन्माला येणे हे सहजी नसते. त्याला जन्मजात हे विशेष गुण लागतात. असे विशेष गुण लोकशाहीर विठ्ठलदादा उमप यांना जन्मजात लाभले होते. आज त्यांचा जन्मदिन. त्यांच्या जगण्याला, कलेला कुर्निसात, मुजरा. स्मृतीस विनम्र अभिवादन !

- भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष, नांदगाव.

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

भोंदूबाबा आणि संसार ...